महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्या घरात ठेवण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीदरम्यान शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या 44 आमदारांच्या सह्यांची मोहिम पार पडली. तसेच या बैठकीत आमदारांना राज्यातील राजकीय स्थितीची माहिती देण्यात आली.
आज पार पडलेली ही बैठक अनौपचारिक असल्यामुळे दिल्लीतील नेत्यांची हजेरी नव्हती. तसेच या बैठकीदरम्यान विधीमंडळ गटनेत्याची निवड झालेली नसून त्याबाबत स्वतंत्र बैठक बोलावणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ही बैठक संपल्यावर आता मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची ‘महा’बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हे नेते तर शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आहेत. त्याचसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे काही बडे नेते थोड्याच वेळात या बैठकीला हजेरी लावतील.