कॉंग्रेसचे 44 आमदार जयपूरच्या फाइव्ह-स्टार रिसॉर्टमध्ये; एका दिवसाचे भाडे 1.5 लाख, जाणून घ्या इतर अलिशान सुविधा
Buena Vista Resorts (Photo Credit : Instagram)

महाराष्ट्रात भाजप सत्तास्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये वाटाघाटी सुरु आहेत. सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या आमदारांना जयपूरमधील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. राजस्थान या कॉंग्रेस शासित राज्यातील रिसॉर्टमध्ये महाराष्ट्रातील आमदारांना अलिशान सुविधा पुरवल्या जात आहेत. सध्या सोशल मिडीयावर याच गोष्टीची चर्चा रंगत आहे. प्रत्येक आमदाराला या सर्व सोयी स्वतंत्रपणे देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेत कॉंग्रेसचे 44 आमदार आहेत, हे सर्व आमदार सध्या जयपूर येथे आहेत.

जयपूर-दिल्ली महामार्गापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुएना व्हिस्टा रिसॉर्ट्समध्ये (Buena Vista Resorts) महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे आमदार मुक्काम करत आहेत. पंचतारांकित रिसॉर्टमध्ये एकूण 50 व्हिला आहेत. प्रत्येक व्हिलामध्ये एका खाजगी तलावाशिवाय रिसॉर्टमध्ये दोन रेस्टॉरंट्स, दोन बार आणि एक स्पा आहे.  एक फ्रेंच राजकारण्याकडे या रिसॉर्टची मालकी असून फ्रेंच आणि राजस्थानी पद्धतीचे आर्किटेक्चर आहे.  कॉंग्रेस दररोज प्रत्येक व्हिलासाठी 1.2 लाख रुपये देत आहे. बुएना व्हिस्टा रिसॉर्ट्सच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, एका साध्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे सुमारे 24,000 रुपये आहे. (हेही वाचा: राजकीय खळबळ! भाजपचे 7 आमदार अजित पवार यांच्या संपर्कात? दर्शवली राजीनामा देण्याची तयारी)

जयपूरमध्ये महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या आमदारांना एखाद्या पर्यटकासारखे समजले जात आहे. ते जोधपूर, आमेर, पुष्कर आणि अजमेरच्या आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देत आहेत. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, राजस्थान हे एक सुंदर राज्य आहे आणि हे आमदार पर्यटक म्हणून आले आहेत. या आमदारांना राज्यातील निसर्गरम्य ठिकाणांची सहल घडवून आणली जाईल.’ कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या काही आमदारांनी पक्ष बदलला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याचमुळे तिथे कॉंग्रेसने आपली सत्ता गमावली. या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कॉंग्रेसने ही खबरदारी घेतली आहे.