Mumbai: संततधार पावसामुळे रेल्वे ठप्प झाल्यास ‘बेस्ट’च्या 400 गाड्या तैनात, चहा, नाश्ता आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध
परिवहन सेवा Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बीएमसीला (BMC) शहरातील प्रवाशांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर, जे शहरात संततधार पावसामुळे अडकून पडू शकतात. त्यामुळे चाकरमान्यांची समस्या लक्षात घेता रेल्वे वाहतूक ठप्प पडणाऱ्या 25 ठिकाणी प्रवाशांच्या सुविधेकरिता पालिका ‘बेस्ट’च्या तब्बल 400 गाड्या (Best Bus) तैनात ठेवणार आहे. शिवाय 11 एसटी बसेसही धावणार आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या मार्गदर्शनात काल  झालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच चहल यांनी अधिका-यांना लोकल ट्रेन सेवा बंद असताना आणि आवश्यक असल्यास प्रवाशांना प्रथमोपचार आणि इतर आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले. लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवावे, अशा सूचना चहल यांनी दिल्या.

अतिवृष्टीत रस्त्यांवर पडणारे खड्टे बुजवण्यासाठी हेल्पलाइन आणि विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. खड्डे विषयक तक्रारींवर 24 तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी 48 तासांपेक्षा अधिक असू नये यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी बैठकीदरस्यान दिले. (हे देखील वाचा: Mumbai Rain Update: मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईत पाण्याचा साठा 66 टक्क्यांवर)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहरातील C1 श्रेणीतील किंवा अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना बीएमसीला केल्या आहेत. अशा इमारतींमधील रहिवाशांसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत तात्पुरती व्यवस्था करावी, अशा सूचना चहल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थिती आणि नागरी सेवांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी 24 सहाय्यक महापालिका आयुक्तांना खासदार आणि आमदारांशी नियमित संपर्क साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.