पुणे: व्यापा-याचे WhatsApp Status फॉलो करुन चोरट्यांनी लंपास केले पावणेचार कोटीचे सोने
(Photo Credits : File Image)

सध्या संपूर्ण जग हे व्हॉट्सअॅपच्या तालावर नाचतय असं म्हणायला हरकत नाही. त्यात व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणे म्हणजे सर्वात महत्त्वाचे काम. सकाळी उठल्या उठल्या किंवा आपण कुठे जाणार आहात, काय करत आहात अशी प्रत्येक क्षणाची इत्यंभुत माहितीचे अपडेट आपल्या व्हॉट्सअॅप वर ठेवणे हा लोकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पण पुण्यामध्ये (Pune) एका व्यापाराला हे व्हॉट्सअॅप ठेवणे महागात पडलय. त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस फॉलो करुन चोरट्यांनी या व्यापा-याला लुटून पावणेचार कोटींचे सोने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, व्यापारी ज्या गावात सोने खरेदीला गेल्याची माहिती स्वत:च्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टाकली होती, ते स्टेटस पाहून चोरट्यांनी या व्यापा-याला दौंड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घरासमोर चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने गाडीत बसवले आणि त्याच्याकडून सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम असा एकूण 3 कोटी 70 लाख 71 हजार किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. धक्कादायक! या वर्षातील सर्वात मोठी सायबर चोरी; 1.3 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचे कार्ड डिटेल्स झाले लीक

ही घटना 6 नोव्हेंबरला सकाळी पावणेसहाच्या सुमारास दौंड गावच्या हद्दीत घडली. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याकडून हा ऐवज हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पवार (27), अभिजीत ऊर्फ बाळू चव्हाण (23), मोहसीन मुलानी (25) आणि प्रथमेश भांबुरे (26) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी जप्त करण्यात आली असून 9 किलो 500 ग्रॅम वजनाचे 29 बिस्कीट, सोन्याच्या 3 मोठ्या पट्ट्या, 4 मोबाईल फोन, एक एअर गन असा 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.