कोरोना काळात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या. यात न केवळ हातावर पोट असणारा माणूस भरडला गेला तर गलेलढ्ढ पगार असणारा उच्चभ्रू वर्गातील माणूसही भरडला गेला. त्यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा आणि घरे कसे चालवायचे हा मोठा प्रश्न अशा लोकांपुढे निर्माण झाला. पुण्यात (Pune) असाच एक बेरोजगार झालेल्या 38 वर्षीय इसमाने आपल्या पत्नी आणि 14 महिन्याच्या मुलाची हत्या करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहै. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत शिंदे असे या इसमाचे नाव आहे. रविवारी सकाळी 11 वाजता पुण्यातील कदमवाक वस्ती येथे ही घटना घडली. हनुमंत शिंदे यांनी पत्नी प्रज्ञा आणि एक वर्षांचा मुलगा शिवतेज याची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत: गळफास लावून स्वत: चे आयुष्य संपवले.हेदेखील वाचा- Maharashtra GDS Recruitment 2021: महाराष्ट्रात ब्रांच पोस्ट मास्टर ते डाक सेवक पदासाठी 2428 जागांवर होणार भरती; 26 मे पर्यंत appost.in वर असा करा ऑनलाईन अर्ज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हे सोलापूर जिल्हातील रहिवासी होते. कामाच्या शोधात हनुमंत शिंदे हे लोणी काळभोर भागातील कदमवाक परिसरात राहण्यासाठी आले होते. इथं त्यांनी एक भाड्याने खोली घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून ते कामाच्या शोधात होते. पण हाती काही काम लागले नाही. त्यामुळे ते नैराश्यग्रस्त झाले होते. काम न मिळालेल्या चिंतेतून रविवारी त्यांनी पत्नी प्रज्ञाची सुरीनं गळा कापून हत्या केली. त्यानंतर एक वर्षाच्या मुलाचीही गळा कापून हत्या केली. त्यानंतर स्वत: पंख्याला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. कोरोना काळात अशा आत्महत्येच्या अनेक घटना दर गिवसा कानावर ऐकायला मिळत आहे.