
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे (Pune) पालकंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा आढावा बैठक घेवुन पत्रकार परिषद घेतली. पुण्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आली असल्याने 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुण्यातील भिमथडी जत्रेला डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे कार्यक्रमही सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 50 टक्के क्षमतेचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला असुन खुल्याजागेतील कार्यक्रम, संगीत कार्यक्रमांना देखील परवानगी असणार आहे असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
सिनेमागृहे आणि नाट्यगृहे संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी सिनेक्षेत्रातून वारंवार करण्यात येत होती. अनेक कलाकारांनी आणि संस्थांनी राज्य सरकारकडे याबाबत विनंती देखील केली होती. पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने सिनेमागृहे आणि नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवनागी दिली गेली आहे. आता मुंबईसह इतर जिल्ह्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ( हे ही वाचा महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, शिवसेना-भाजप पुन्हा युती; रामदास आठवले यांची भविष्यवाणी.)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात विविध प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, पुण्यात परिस्थिती बरी आहे पण जागतिक पातळीवर कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमिक्रॉन व्हायरसचा फैलाव होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी तसेच गरज लागल्यास पुन्हा काही निर्बध आणावे लागतील असे अजित पवार यांनी म्हटले आहे.