Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

Coronavirus: कोरोना संक्रमणापासून दूर राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुंबई आणि पुण्याहून आलेल्या तीन जणांनाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच एकाच वेळी 3 कोरोनाग्रस्त सापडल्याने गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये गेला आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये कुरखेडा गावातील 2 तर चामोशीमधील एका कोरोनाग्रस्ताचा समावेश आहे. या तिघांना मुंबई-पुण्याहून आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, या रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आलेले नाही. सध्या या रुग्णांना गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Coronavirus: बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; जिल्ह्यात एकूण 9 जणांना संसर्ग)

गडचिरोलीचे जिल्ह्याधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले की, जिल्हयातील नागरीकांना आणि बाहेरुन आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेदेखील आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. परंतु, मुंबई- पुण्यावरून येणाऱ्या रुग्णांमुळे गडचिरोली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असणारा मराठवाड्यातील बीड जिल्हादेखील ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. बीडमध्ये आतापर्यंत 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.