Coronavirus: बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; जिल्ह्यात एकूण 9 जणांना संसर्ग
Covid 19 (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे हळहळू संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पसरत चालले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. यातच महाराष्ट्रात ग्रीन झोनमध्ये समावेश असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित आढळलेल्या 65 वर्षीय महिलेचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी तिच्यासह 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. संबंधित महिला मुळची पिंपळगाव (ता.जि.नगर) येथील रहिवासी असून मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकाकडे आली होती. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 वर पोहचली आहे. यापैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 29 स्वॅब पैकी प्रलंबित राहिलेले 7 स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून 14 मे रोजी हे 7 जण 14 तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आले होते. हे सर्व पिंपळगाव खुडा अहमदनगर येथील रहिवाशी आहेत. याशिवाय गेवराई तालुक्यातील इटकूर मध्ये 1 रुग्ण तर, माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावात 1 रुग्ण पॉझिटिव्ह सापडला होता. हे दोघेही मुंबई-पुण्याहून चोरट्या मार्गाने बीडमध्ये आले होते. हे देखील वाचा- COVID19: लॉकडाउनच्या कारणास्तव शहरातून महाराष्ट्रातील खेड्यात येणाऱ्यांमुळे चिंता वाढली

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून गेवराई, बीड , माजलगाव आष्टी या 4 तालुक्यांतील एकूण 43 गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.