हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे निधन; 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला फासावर नेण्याच्या निर्णयात दिली होती महत्त्वाची साक्ष
Harishchandra Srivardhankar (Photo Credits: Twitter)

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील (Mumbai 26/11 Attack) दहशतवादी अजमल कसाब (Ajmal Kasab) याची ओळख पटवणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर (Harishchandra Srivardhankar) यांचे मंगळवारी (26 मे) निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. प्रदीर्घ आजारानंतर राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर कल्याण येथील स्मशानभूमीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सूना, एक मुलगी व जावई असा परिवार आहे. 26/11 च्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला ओळखणारे हे पहिले साक्षीदार होते. विशेष म्हणजे कसाबला फासापर्यंत पोहचवण्यासाठी हरिश्चंद्र यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती.

कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल याने झाडलेल्या दोन गोळ्या हरिश्चंद्र यांच्या पाठीत घुसल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते. या झटापटीत त्यांच्या गळ्यावर चाकूच्या दोन जखमाही झाल्या होत्या.

मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील चिंचपोकळी मधील सातरस्ता येथील डिसुझा नामक दुकानदाराला ते रस्त्यावर बेवारस आढळले होते. त्यांनी पोलिसांच्या मदतीने हरिश्चंद्र यांची त्यांच्या कुटुंबाशी भेट करून दिली होती.

काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना कल्याणच्या आयुष रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती. तसंच भाजपकडून त्यांच्या उपचारासाठी दहा लाखाच्या मदतीचीही घोषणा केली होती. दरम्यान श्रीवर्धनकर यांच्या मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीस ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.