मुंबई: घरात आधुनिक पद्धतीने गांजाची लागवड करणा-या 26 वर्षीय तरुणाला अटक; आरोपीकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
Hemp Representative Image (Photo Credits: PixaBay)

आजची तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. यापासून त्यांना रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरीही अजून पूर्णपणे या गोष्टीची नायनाट झालेला नाही. त्याचे ताजं उदाहरण पाहायला मिळालं ते चेंबूर (Chembur) येथील माहूल परिसरात. या परिसरात एका तरुणाने चक्क घरातच गांजाची लागवड केली. त्याने आपल्या मित्राच्या घरात 'हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम' च्या साहाय्याने गांजाची लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, गांजाची विक्री करणा-या या 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून ज्याची घरी गांजाची लागवड केली जायची तो मित्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

निखिल शर्मा असे या आरोपीचे नाव असून हा आपले अभियांत्रिकी शिक्षण अर्धवट सोडून तो या मार्गाकडे वळला. निखिल खांद्याला एक बॅग अडकवून माहुल परिसरात संशयितरित्या फिरताना पोलिसांना दिसला. त्यावेळी त्यांना निखिलला त्वरित अडवून त्याची तपासणी केली. यावेळी आरोपी तेथून पळ काढत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. या झडतीत त्यांना 1 किलो गांजा आणि 54 ग्रॅम एमडी सापडले.  Global Weed Consumption यादीत मुंबई 6व्या तर दिल्ली 3ऱ्या स्थानी; पाकिस्तान मधील कराची टॉप 2 वर

सुमारे तीन लाख रुपये किमतीचे हे अमलीपदार्थ होते. निखिल याने हा गांजा मित्राच्या घरातच ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’च्या साहाय्याने उत्पादित केल्याची माहिती पोलिसांना दिली. निखिलचा मित्र हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निखिलने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी माहुल परिसरातील पालव बाग येथील घरावर छापा घातला. या छाप्यात त्यांना ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’चे तीन तंबू, कुंडय़ा, एलईडी दिवे, टायमर यंत्रणा, पीएच सॉइल टेस्टर, आद्र्रता मापक, हायड्रोपोनिक न्युट्रियंट्स, गांजाच्या वेगवेगळ्या प्रजातीच्या बिया असे सहा लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

निखिलच्या फरार मित्राने एका संकेतस्थळाच्या माध्यमातून गांजा उत्पादनासाठी आवश्यक साहित्य, केमिकल्स, अमलीपदार्थ मागविले होते, अशी माहिती प्रभारी पो.निरीक्षक अशोक खोत यांनी दिली. त्याच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे