पुणे: कोरोना झाल्याच्या भितीने आत्महत्या केलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह
Representational Image (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. यातच पुणे (Pune) शहरात कोरोना झाल्याच्या भितीने 24 वर्षीय तरुणाने गुरूवारी आत्महत्या केली होती. मात्र, मृत्यूनंतर मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच तसेच आजूबाजुच्या परिसरातील नागरिक चिंतेत पडले आहेत.

पुण्यात आत्महत्या केलेल्या तरुणाला सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे कोरोना संशयित रुग्ण म्हणून बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात आणले होते. दुपारी तपासणीसाठी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यानंतरही तो तणावग्रस्त होता. रात्री नऊ वाजताच्या सुमारास तरुणाने स्वच्छतागृहात जाण्याचे कारण सांगितले आणि तो खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन त्याने आत्महत्या केली. तरुणाचा कोरोना तपासणीचा अहवाल शुक्रवारी येणार होता. मात्र, कोरोनाची भीती सतावत असल्याने बेचैन असलेल्या तरुणाने आत्महत्येचा दुर्दैवी निर्णय घेतला. तसेच मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याच्या नातेवाईकांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अंबरनाथ पोलीस ठाण्यातील 4 आरोपींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरातील नागरिकांच्या मनात मोठी भिती पसरली आहे. देशात कोरोना विषाणूच्या भितीने अनेकांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईनंतर पुणे शहरात सापडले आहेत. पुण्यात आतापर्यंत 3 हजार 481 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 432 जण कोरोनामुक्त झाले आहेत.