Coronavirus: मुंबईतील Containment Zones च्या यादीतून 231 झोन्स झाले मुक्त- किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar (Photo Credit: Twitter)

कोरोना सारख्या विषाणूशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण शासकीय आणि वैद्यकिय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना (Coronavirus) बाधितांची संख्या असलेल्या मुंबईतही काही वेगळी परिस्थिती नाही. अधिक लोकसंख्या आणि दाटीवाटीच्या असलेल्या मुंबईसारख्या शहरात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणा-या कोरोना बाधितांची संख्या पाहता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या यादीतून 231 परिसर मुक्त झाले आहे. ही माहिती मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली आहे.

मुंबईत सध्या 1036 कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेलेल आहेत. यातून वगळण्यात आलेले 231 झोनमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही कोविड-19 बाधित रुग्ण न आढळल्याने यांची या यादीतून मुक्तता झाल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. या यादीमुळेच हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. COVID19 च्या काळात नवी मुंबई पोलिसांनी गरोदर महिला आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुरु केले 'हे' 3 Helpline Number

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ने अक्षरश: धुमाकूळ घातला असून राज्यात सद्य स्थितीत एकूण 8068 रुग्ण आढळले आहेत. तर 342 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 6343 वर पोहोचली असून 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुण्यात 1128 कोरोना बाधितांची एकूण संख्या झाली आहे.

दरम्यान भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,892 वर पोहोचली असून 872 रुग्ण दगावले आहेत. तर 6185 बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.