Pothole-ridden road of Mumbai | Representational image | (Photo credits: Twiiter/Aniket Sanghvi)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना रोज ऐकायला मिळतायत. काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाच्या खरेदीला जाणा-या 23 वर्षीय तरुणीचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडते ना पडते तोच ठाणे जिल्ह्यात याच खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, शिळफाटा रोडवर हा अपघात झाला असून एका तरुणाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. असिम सिद्दीकी (वय-22) असे मृत तरुणाचे नाव आहे.

असिम मुंब्रा (Mumbra) येथे राहत होता. तो रात्री गाडीत पेट्रोल भरण्याकरता बाहेर गेला होता. असिम शिळफाटा रोडवरुन आपल्या घरी परतत असताना रात्री 10.30 च्या सुमारास असिमची गाडी रस्त्यावर पडलेल्या खड्डयात आदळली. असिम रस्त्यावर पडला तितक्यात मागून आलेल्या कंटेनरने असिमला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत असिमला जवळच्याच काळसेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

डॉ. नेहा शेख हिच्या मृत्यूनंतर वाडा-भिवंडी टोल बंद; सुप्रीम कंपनीवर राज्य सरकारची कारवाई

या घटनेत पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाला आणि कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र चालकासोबतच ज्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावर खड्डे पडले आणि याच्यामुळे असिमचा जीव गेला आहे. त्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी असिमच्या नातेवाईकांनी केली आहे.

वाडा-भिवंडी (Wada-Bhiwandi) महामार्गावरील खड्ड्यामुळे दुगाडफाटा (Dugadfata) येथे 10 ऑक्टोबर रोजी डॉ. नेहा शेख (Dr. Neha Shaikh) या तरुणीचा मृत्यू झाला होता, या घटनेमुळे पसरलेली संतापाची लाट कमी होण्याआधीच दुसऱ्या दिवशी राम प्रसाद गोस्वामी या व्यक्तीचा देखील खड्ड्यांमुळे नाहक बळी गेला, त्यामुळे एकंदरीतच निकृष्ठ बांधकाम असणाऱ्या रस्त्यांचा व परिणामी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.