वाडा-भिवंडी (Wada-Bhivandi) महामार्गावरील खड्ड्यामुळे दुगाडफाटा (Dugadfata) येथे 10 ऑक्टोबर रोजी डॉ. नेहा शेख (Dr. Neha Shaikh) या तरुणीचा मृत्यू झाला होता, या घटनेमुळे पसरलेली संतापाची लाट कमी होण्याआधीच दुसऱ्या दिवशी राम प्रसाद गोस्वामी या व्यक्तीचा देखील खड्ड्यांमुळे नाहक बळी गेला, त्यामुळे एकंदरीतच निकृष्ठ बांधकाम असणाऱ्या रस्त्यांचा व परिणामी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रश्नांवर प्रतिक्रिया देत राज्य सरकारने या महामार्गावरील अनगाव (Angaon) आणि वाघोटे (Waghote) टोल नाके बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या रस्त्याच्या बांधकाम व व्यवस्थापनसाठी जबाबदार असणाऱ्या सुप्रीम कंपनी (Supreme Company) वर कारवाई करत करार रद्द करण्यात आला आहे. कंपनीचे संचालक विक्रम शर्मा आणि चेतन भट यांच्याविरोधात कलम 420 आणि सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुप्रीम कंपनीकडे भिवंडी-वाडा महामार्गाचे काम देण्यात आले होते, मात्र हे बांधकाम अर्धवट आणि निकृष्ठ दर्जाचे झाले होते, यामुळेच आजवर याठिकाणी 350 हुन अधिकांचा मृत्यू झाला आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या सुप्रीम कंपनीवर दोन वर्षांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र 10 ऑक्टोबरला डॉ. नेहा हिच्या मृत्यूनंतर हे प्रकरण बरेच चिघळले. संतप्त नागरिकांनी या मार्गावर तब्बल 7 तास रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले.
दरम्यान महामार्गाच्या बांधकामावरील याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने सुप्रीम कंपनीला 6 महिन्यात रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. पण तरीही हे काम पूर्ण न झाल्याने आज नेहा शेख सारख्या अनेकांचा बळी गेला आहे. परिणामी दुरुस्तीच्या नावावर नागरिकांचे पैसे उकळणाऱ्या कंपनीचे महामार्गावरील टोलनाके बंद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नागरिक समाधानी असले तरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः काम हाती घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.