Woman Dies Due to Rabies: कोल्हापुरातील (Kolhapur) एका 21 वर्षीय तरुणीचा रेबीज (Rabies) मुळे मृत्यू झाला. अँटी रेबीज लसीकरण कोर्स (Anti-rabies Vaccination Course) पूर्ण केल्यानंतर 3 दिवसांनी तिची मृत्यूशी झूंज संपली. सृष्टी शिंदे असं या तरुणीचं नाव होतं. 3 फेब्रुवारी रोजी भाऊसिंगजी रोडवर सृष्टीला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. ती शनिवार पेठेत जात असताना ती फोनवर बोलत होती. यावेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्या पायाला चावा घेतला. कुत्रा चावल्यानंतर सृष्टीने रेबीज प्रतिबंधक लसीचे पाचही डोस घेतले होते.
कुत्रा चावल्यानंतर सृष्टीला ताप आला. त्यानंतर ती अशक्त होत गेली. त्यानंतर सृष्टीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे अनेक चाचण्या करण्यात आल्या. तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. चाचणी अहवालात तिला रेबीजची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. (हेही वाचा -Kanpur Dog Killing Video: कानपूरमध्ये भटक्या कुत्र्याची तरुणाकडून निर्घृण हत्या; घटना CCTV मध्ये कैद (Watch Video))
त्यानंतर पुढील उपचारासाठी सृष्टीला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. लसीचा कोर्स पूर्ण करूनही तिला रेबीज कसा झाला, असा प्रश्न सृष्टी शिंदेच्या मृत्यूमुळे निर्माण झाला आहे. लस आवश्यक तापमानात ठेवली होती का? असा प्रश्न तिचे कुटुंबीय रुग्णालय प्रशासनाला करत आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी गाझियाबादमध्ये एका 14 वर्षीय मुलाचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. एका महिन्यापूर्वी या मुलाला कुत्र्याने चावा घेतला होता, परंतु त्याने त्याच्या पालकांना याबद्दल सांगितले नाही. भीतीपोटी, मुलाने आपल्या कुटुंबाला घटनेबद्दल सांगितले नाही आणि चार दिवसांनंतर त्याला रेबीजची लक्षणे जाणवू लागली. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सबेजला वारा आणि पाण्याची भीती वाटू लागली. यानंतर, सबेजला गाझियाबाद, मेरठ आणि दिल्लीच्या एम्समधील अनेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याला उपचारासाठी बुलंदशहर येथेही नेण्यात आले. बुलंदशहरहून वडील याकूबसोबत परतत असताना सबेजचा मृत्यू झाला. सबेझच्या कुटुंबीयांनी या घटनेवर कारवाईची मागणी केली होती. अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासन आणि अधिकाऱ्यांना विनंती केली होती.