Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

Coronavirus: नांदेड (Nanded) मधील गुरुद्वारा लंगर साहिब (Gurdwara Langar Sahib) येथे राहणाऱ्या 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खाल्लाळ यांनी माहिती दिली आहे.

याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील हजूर साहिब येथून पंजाबला परत आल्यानंतर राज्यातील 137 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. नांदेड येथे असलेल्या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दोन्ही राज्यांमध्ये येजा करत असतात. परंतु, याठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गुरुद्वारा तसेच संबंधित परिसर सील करण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus: नांदेड जिल्ह्यातील हजूर साहिब येथून पंजाब राज्यात परतलेले 137 जण कोरोना व्हायरस संक्रमित)

नांदेडमध्ये आज 20 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 26 वर पोहचला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून 24 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नांदेडमधील गुरुद्वारा लंगर साहिब येथील 97 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नांदेडमध्ये शहरात 22 एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता.