
बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आकडा हा आता पन्नाशीकडे जात असून आज आणखीन 2 रूग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याची एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. सोमवारी प्रलंबित असलेल्या 7 अहवालांपैकी 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर आणखी 5 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आदर्श पॅटर्न राबवत मागचे दोन महिने कोरोना शून्य असलेल्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्ह्यात सापडलेले अनेक रुग्ण हे मुंबई-पुण्याहून आलेले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा - Coronavirus: धारावीत आज 38 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1621 वर पोहोचली)
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सोमवारी महाराष्ट्रात 2436 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 60 जणांचा बळी गेला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52,667 वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात 1695 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
याशिवाय भारतात मागील 24 तासांत कोरोना व्हायरस संक्रमित 6,535 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 146 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,45,380 इतकी झाली आहे. यातील 80722 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 4167 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.