Cloudy Weather | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Weather Forecast in Maharashtra: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्यम ते हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिसावला आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी आणखी दोन दिवस पावसाचे सावट असणार आहे. पुढील दोन दिवसांत चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

सोमवारी दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच मराठवाडा व विदर्भात मागील तीन दिवस गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय सोमवारी दुपारनंतर पुणे शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. शिरूर, भोर, खेड, पुरंदर या भागात ढगाळ होते. (वाचा - Rain in Maharashtra: पुणे शहरात मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी)

दरम्यान, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पुन्हा गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय गुरुवारपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.