मुंबईत काल रात्री पडलेल्या पावसामुळे एक विचित्र अपघात घडला असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री एकच्या दरम्यान अमर महज ब्रिजवरील ठाणे मार्गावर हा अपघात घडला. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने डम्पर रिक्षाला धडकला. त्यामुळे रिक्षा पुढे असलेल्या बस आणि डम्परमध्ये चिरडली गेली. या अपघातात रिक्षाचालक सुभाष बिंद आणि रिक्षातून प्रवास करत असलेले सुफियान अन्सारी या दोघांचा मृत्यू झाला आहे.
पहिल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे डम्परचालकाचे नियंत्रण सुटले आणि हा विचित्र अपघात घडला. अपघातानंतर जखमींना तात्काळ राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सुभाष आणि सुफियान यांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या मोना यांची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेतले आहे.