उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेनेकडून 2 कोटींची ऑफर; आदित्य ठाकरेंच्या विरोधातील गौतम गायकवाड यांची पोलिसात धाव
गौतम गायकवाड आणि आदित्य ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेल्या उलतापालथी पाहता यंदाचा निकाल अनपेक्षित लागणार असल्याचे दिसून येत आहे. यंदा पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे, त्यामुळे अपेक्षा देखील वाढल्या आहेत. अशात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिवसेनेने 2 कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याची माहिती वंचितचे उमेदवार गौतम गायकवाड (Gautam Gaikwad) यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

यंदा पहिल्यांदाच शिवसेनेकडून ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात वंचितने माजी पोलीस अधिकारी गौतम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. मात्र गायकवाड यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी ठाण्यातून त्यांना एक फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन 2 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या वंचितच्या उमेदवारालाही 25 लाखांची ऑफर देण्यात आली आहे. (हेही वाचा: अभिजीत बिचुकले यांना निवडणूक आयोगाचा दणका; वरळी विधानसभा मतदारसंघात प्रचारा दरम्यान 'या' गोष्टीमुळे मिळाली नोटीस)

लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये गायकवाड म्हणाले, 'उमेदवारीचा अर्ज भरल्यासून शिवसेना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. आनंद दिघे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून 2 कोटी रुपयांचे ऑफर दिली होती.' याबाबत गौतम यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर संशय असल्याचे सांगितले आहे. या तक्रारीनंतर गायकवाड यांच्या सोबत एक पोलीस तैनात करण्यात आला आहे. वरळी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.