पिंपरी-चिंचवड: 18 वर्षीय मुलीवर हल्ला करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

भांडण मिटवण्यासाठी हस्तक्षेप केलेल्या 18 वर्षीय मुलीवर हल्ला करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे गुरुवारी घडली आहे. पीडित तरुणीच्या भावाचे आरोपीशी भांडण झाले होते. शुक्रवारी सकाळी संजयनगर येथील फुगेवाडी परिसरातील भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून भोसरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे आजुहबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शैलेश एकनाथ हाके (वय 30), रूपेश एकनाथ हाके ऊर्फ जीवा (वय 27) , एकनाथ हाके, (वय 67) आणि निलेश एकनाथ हाके (वय 36) अशी या चौघांची नावे आहेत. आरोपींच्या वडिलांचाही यात समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश आणि रूपेशने पीडितेच्या भावाशी भांडण केले होते. दरम्यान, पीडिताने या भांडणात हस्तक्षेप केल्यामुळे मुख्य आरोपी शैलेश आणि रुपेश यांच्यासह त्यांचे वडिल एकनाथ आणि भाऊ निलेश यांनी तिचा विनयभंग केला. एवढेच नव्हेतर, लोखंडी रॉडने तिच्यावर हल्ला केला. ज्यात तिच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे, अशी माहिती हिंदुस्थान टाईम्सने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- मुंबई: मीरा रोड परिसरात रेस्टॉरंटच्या पाण्याच्या टाकीत 2 कामगारांचे मृतदेह

आरोपी अद्याप फरार आहेत आणि आरोपींना पकडण्यासाठी शोध शाखेच्या कर्मचार्‍यांची टीम पाठविली आहे. पोलिसांनी जवळच असलेल्या भागात लपून बसलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी जवळच्या जिल्ह्यात एक पथकही पाठवले आहे.