Coronavirus: महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी, मुंबईत 16 तर पुण्यात 2 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 320 वर पोहचला
Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

Coronavirus: महाराष्ट्रात 18 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 320 वर पोहचला आहे. तसेच महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 12 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज मुंबईत 16 तर पुण्यात 2 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशातचं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई आणि पालघरमध्ये प्रत्येकी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 12 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Coronavirus: मध्य प्रदेशात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आल्याने आकडा 86 वर पोहचला;1 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत 75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे बळी गेला. तसेच पालघरमध्येही 50 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. यापूर्वी मुंबईत 8, तर नवी मुंबई, पुणे, पालघर आणि बुलडाण्यात प्रत्येकी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना विषाणुमुळे जगातील सर्वच देश धोक्यात आले आहेत. चीन, इटली नंतर आता जगातील महासत्ता असणार्‍या अमेरिकेमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. अमेरिकेत मंगळवार अवघ्या 24 तासांमध्ये सुमारे 865 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय जगात आतापर्यंत 7 लाख 54,948 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 36 हजार 571 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने माहिती दिली आहे.