Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 179 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण, तर 3 जणांचा मृत्यू
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) 179 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता 17,091 इतकी झाली आहे. सध्या 3,064 पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 13,851 जणांची कोरोना विरुद्धची झुंज यशस्वी झाली आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत राज्यात 176 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस विभागाने माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कोरोना लढाईत योद्धा म्हणून कार्य पार पाडणाऱ्या अनेकांना या विषाणूने विळखा घातला आहे. आतापर्यंत अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशभरात आजही अनेक कोरोना योद्धे दिवस रात्र कोरोना रुग्णांची प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष सेवा करत आहेत. (हेही वाचा -India's Daily COVID-19 Testing Capacity: भारताची दैनंदिन कोरोना चाचणी क्षमता 11.70 लाखांवर; गेल्या 24 तासात देशात 7,20,362 चाचण्या)

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 23,350 कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच 328 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 9,07,212 इतकी झाली आहे.