Coronavirus: सोलापूरातील 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणुची लागण
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

Coronavirus: सोलापूरातील (Solapur) 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 250 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 700 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या पोलिसांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये आणखी 2 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

याशिवाय या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या 9 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आतापर्यंत सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलातील 13 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून शहर पोलीस आयुक्तालयातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (हेही वाचा - मुंबई: केईएम रुग्णालयातील कोरोना बाधित मृतदेहांच्या शेजारी अन्य रुग्णांवर उपचार होत असलेल्या व्हिडिओवर शिवसेना खासदार अनिल देसाई यांचे स्पष्टीकरण)

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलीसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत. मात्र, हे करत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 250 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 11 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 41 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.