श्री महालक्ष्मी (Photo Credit : Facebook)

आज सर्वत्र दसऱ्याच्या (Dussehra) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. गेले नऊ दिवस चालू असलेल्या नवरात्रीची आज सांगता होत आहे. देशभरात ठिकठिकाणी देवीची पूजा अर्चना होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून पुण्यातील (Pune) श्री महालक्ष्मीला तब्बल 16 किलो वजनाची सोन्याची साडी अर्पण केली गेली आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध सारसबागेसमोर हे देवीचे मंदिर आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर इथे भाविकांची मोठी गर्दी असते. यावर्षीही देवीचे सुवर्णलंकार पाहण्यासाठी लोक या मंदिराला भेट देत आहेत.

मंदिर प्रशासनाकडून दसऱ्यानिमित्त ही साडी देवीला अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेल्या या साडीचे वजन 16 किलो इतके आहे. वर्षातून फक्त दोनच दिवस म्हणजे दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साडी देवीला नेसवली जाते. 8 वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील अव्वल कारागिरांनी ही साडी बनवली होती. ही साडी बनवण्याचे काम 5 महिने चालले होते. (हेही वाचा: Gold Price on Dussehra 2019: दसऱ्याच्या शुभदिनी जाणून घ्या सोन्याचे मुंबई, नागपूर आणि पुणे येथील आजचे दर)

दसऱ्या निमित्त या साडीसोबतच देवीला इतर अनेक सुवर्ण अलंकार परिधान केले जातात. महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्याचे यंदाचे नववे वर्ष आहे. दुसरीकडे कोलकाता शहरातील एका मंडळाने तब्बल 50 किलो सोन्याची देवीची मूर्ती बसवली आहे. सध्या देशभरात याच मूर्तीची चर्चा आहे. 13 फूट उंचीची ही मूर्ती बनवण्यासाठी साधारण 20 कोटी रुपये खर्च आला आहे. संतोष मित्र चौकात असलेल्या मंडपामध्ये या मूर्तीची स्थापना केली जाईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही मूर्ती बसवण्यासाठी मंडळाकडून मदत केली गेली नाही, विविध सोनार एकत्र येऊन त्यांनी ही मूर्ती बनवण्यासाठी सोने पुरवले आहे.