Nagpur Gangrape: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; पाच जणांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेक (Ramtek) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. या परिसरात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार (Gangrape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पीडित मुलीच्या मित्रानेच तिचा घात केल्याचे समजत आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 29 डिसेंबरला एका तरुणासोबत खिंडसी परिसरात गेली होती. त्यावेळी आरोपीने आपल्या मित्रांना फोन करून त्याठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्याठिकाणी जमलेल्या पाचही जणांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने रात्री उशिरा घरी पोहोचल्यावर आई वडिलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शनिवारी रात्री (2 जानेवारी 2021) पीडित मुलीच्या पालकांनी रामटेक पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली. त्यानुसार पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Pune: गर्लफ्रेंडला त्रास दिला म्हणून आपल्याच मित्राच्या गळ्यावर केले सपासप वार; पुणे येथील धक्कादायक घटना

अतुल हटवार, धीरज, होमदास, सौरभ हर्षल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हे नोंदवले गेले आहेत. महिला पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.