Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session) पहिल्या दिवशी, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Presiding Officer Bhaskar Jadhav) यांच्यासोबत त्यांच्या दालनात हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केल्याबद्दल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. आता या 12 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय मुद्दाम घेण्यात आला होता. असा निर्णय घेण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली नव्हती.

6 जुलै रोजी विधानसभेमध्ये आणि भास्कर जाधव यांच्या दालनात त्यांच्याशी मानहानीयुक्त आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र विधानसभेतील 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. आता त्यांनी या कारवाईला आव्हान देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा, विरोधकांची संख्या कमी करत विरोधी पक्षाचे सामर्थ्य कमी करण्यासाठीच अशी कारवाई केली गेली असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. (हेही वाचा: कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या अन्यथा तीव्र आंदोलन करु- प्रविण दरेकर)

हे आहेत 12 आमदार –

डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव

आशिष शेलार, वांद्रे पश्चिम

अभिमन्यू पवार, औसा, लातूर

गिरीश महाजन, जामनेर, जळगाव

अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई

पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई

हरिश पिंपळे -मूर्तिजापूर, अकोला

राम सातपुते, माळशिरस, सोलापूर

जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे

योगेश सागर, चारकोप, मुंबई

नारायण कुचे, बदनापूर, जालना

कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर

या याचिकेत आमदारांनी म्हटले आहे की, 12 आमदारांना आपले स्पष्टीकरण देण्याची संधी दिली पाहिजे. कारवाईचे कारण सांगतांना भास्कर जाधव म्हणाले होते की, ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्ष सदस्य दालनात आले व त्यांनी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. एखाद्या गावगुंडासारखे ते वागले. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.