Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 106 नवे कोरोना बाधित तर 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रातील पोलिस (Maharashtra Police) दलाभोवती बसलेला कोविड-19 (Covid-19) चा विळखा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. मागील 24 तासांत  106 नव्या कोरोना बाधित पोलिसांची भर पडली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या  14,295 वर पोहचली असून त्यापैकी 2,604 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) आहेत. तर 11,545 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून एकूण 146 पोलिसांना आपले प्राण गमावावे लागले आहेत.

कोरोना व्हायरस संकटकाळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असलेल्या पोलिसांनी कर्तव्यापलिकडे जात काम केले. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामावर डॉक्युमेंटरी देखील तयार करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या सुरक्षेकडे गृहखात्याचे विशेष लक्ष होते. त्याचबरोबर पोलिसांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. (कोविड-19 संकटात महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अविरत कार्याचा आढावा दर्शवणारी डॉक्युमेंटरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे केली शेअर!)

ANI Tweet:

सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे पोलिसांवर जबाबदारी अधिकच वाढली आहे. तसंच सप्टेंबरपासून अनलॉकच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होईल. त्यामुळे पोलिस यंत्रणा अधिक सतर्क होईल. दरम्यान अद्याप कोविड-19 वर लस उपलब्ध झाली नसल्याने धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांना सहकार्य होईल आणि सुरक्षाही जपली जाईल.