नागपूरात कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे 1 हजार बेडचं जम्बो रुग्णालय; डॉ. नितीन राऊत यांची माहिती
Nitin Raut (Photo Credit: ANI)

विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे ‘जम्बो रुग्णालय’ (Jumbo Hospital) मानकापूर (Mankapur) येथे उभारण्यात येणार आहे. यात सुमारे 1 हजार बेडची सुविधा करता येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात नागपूर येथे ‘जम्बो कोविड हॉस्पिटल’साठी शहरातील योग्य जागा सुलभ होईल, यादृष्टीने डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. (हेही वाचा - Police Pre-Recruitment Training: अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; नवाब मलिक यांची माहिती)

दरम्यान, विदर्भातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणे, तसेच शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची निर्मिती करण्यात येत आहे. जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वासदेखील नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

कोवीड रुग्णांसाठी मुंबई तसेच पुणे येथे ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शहरात देखील एक हजार रुग्णांसाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने राधास्वामी सत्संग (कळमेश्वर), शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.