Air India Flight (PC - Wikimedia Commons)

Mumbai: मुंबईहून रियाधला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये (Air India Flight) प्रवाशाच्या चेक-इन केलेल्या बॅगमधून 1.60 लाखांची चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सहार पोलिस ठाण्यात (Sahar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी घडली.

एफआयआरनुसार, नालासोपारा रहिवासी मुद्दस्सीर शेख (वय, 26) हा एका खासगी कंपनीत नोकरीला असून, 7 ऑक्टोबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रियाधला कामासह धार्मिक सहलीसाठी आला होता. तो एअर इंडियाने उड्डाण करत होता. त्याच्याकडे दोन निळ्या ट्रॉली बॅग होत्या. या बॅगची तपासणी करण्यात आली होती. (हेही वाचा - Emergency Landing Of Aircraft: रेड बर्ड अकादमी टेकनाम विमान VT-RBT चे बारामती येथे आपत्कालीन लँडिंग (Watch Video))

यातील एका बॅगेत 1 लाख 60 हजार रुपये आणि कागदपत्रे होती. सायंकाळी 5.30 च्या सुमारास विमानाने उड्डाण भरले. 8 ऑक्टोबरला तो उतरला तेव्हा त्याला त्याची फक्त एक बॅग मिळाली. त्याने एअर इंडियाच्या रियाध कार्यालयात जाऊन त्याची दुसरी बॅग न मिळाल्याबद्दल तक्रार नोंदवली, पण त्याला एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र, 10 ऑक्टोबर रोजी हरवलेली बॅग एआयच्या रियाध कार्यालयात मुद्दसिरला देण्यात आली. त्याने बॅग उघडली तेव्हा त्याच्या हॅण्डबॅगमध्ये अमेरिकन डॉलर्स व इतर कागदपत्रे गायब असल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. मुद्दस्सिर 19 ऑक्टोबर रोजी मुंबईत परतला आणि दोन दिवसांनंतर त्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला.