एक्सपायर झालेली सौंदर्यप्रसाधने फेकून देण्याऐवजी असा करा पुन्हा वापर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : TechRasa)

स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो. त्वचेचा प्रश्न असल्याने शक्यतो अशी  उत्पादने विकत घेताना क्वालिटीला महत्व दिले जाते. भलेही चार पैसे जास्त जाऊदे मात्र त्या उत्पादनाचा कोणता दुष्परिणाम व्हायला नको असा साधा विचार केला जातो. मात्र बरेचवेळा अशी महागडी उत्पादने वरचेवर वापरली जात नाहीत. त्यामुळे काही कालावधीनंतर ही उत्पादने एक्सपायर होऊन जातात. म्हणजेच या उत्पादनांचा उपयोग तुम्ही तुमच्या त्वचेसाठी करू शकत नाही. अशावेळी इतकी महागाची उत्पादने अशीच फेकून देणे फारच जीवावर येते. मात्र बरेचवेळा अशा एक्स्पायर झालेल्या उत्पादनांना कचराकुंडीचाच रस्ता दाखविला जातो. यावरच उपाय म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा एक्स्पायर झालेल्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर पुन्हा कशा प्रकारे करता येईल ते सांगणार आहोत. म्हणजेच अशी उत्पादने इतर विविध गोष्टींसाठी रीयुज करता येईल.

1. मेकअप ब्रश –

मेकअप ब्रशचा खूप जास्त प्रमाणात आणि जास्त कालावधीसाठी वापर केल्याने तो हार्ड बनतो. साहजिकच चेहऱ्यासाठी मेकअप करताना अशा ब्रशचा अजिबात उपयोग होत नाही. मात्र हार्ड झाल्यामुळे हा ब्रश फेकून देण्याऐवजी तुम्ही तो कीबोर्ड, इलेक्ट्रॉनिक गोष्टी किंवा इतर छोट्या छोट्या गोष्टी साफ करण्यासाठी वापरू शकता.

2. परफ्यूम –

एक्स्पायर झालेल्या परफ्यूमला फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा रूम फ्रेशनर म्हणून वापर करू शकता. तसेच बाथरूममध्येही चांगला सुगंध दरवळत राहावा म्हणून अशा परफ्यूमचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या बुटांमध्ये येणारी दुर्गंधी थांबवण्यासाठीही अशा परफ्यूमचा वापर होऊ शकतो.

3. जेल आयलाइनर –

काळ्या रंगाच्या जेल आयलाइनरचा उपयोग तुम्ही तुमचे बूट अथवा शूज चमकवण्यासाठी करू शकता. बरेचवेळा काळ्या रंगाच्या फुटवेअरवर स्क्रॅच पडल्याने ते निकामी होतात मात्र, तुमचा एक्स्पायर झालेला जेल आयलाइनर त्यावरील चांगला उपाय ठरू शकतो.

4. फेशिअल टोनर –

एक्स्पायर झालेला फेशिअल टोनर हा क्लिनरप्रमाणे कार्य करू शकतो. घरातील काचा, आरसे, सेंटर टेबल स्वच्छ करण्यासाठी अशा टोनरचा उपयोग होऊ शकतो.

5. आयशॅडो –

तुमचा आयशॅडो जर का खराब झाला असेल तर त्याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची नेलपॉलिश बनवण्यासाठी करू शकता. हा आयशॅडो तुम्ही तुमच्या नेलपॉलिशमध्ये मिक्स करून वेगवेगळ्या प्रकारचे रंग तुमच्या नखांवर ट्राय करू शकता.

6. लिपस्टिक –

बरेचवेळा लिपस्टिकचे अनेक वेगवगळ्या प्रकारचे शेड्स आपण विकत घेतो, मात्र रोजच्या वापरात्त त्यातील एक किंवा दोनच शेड्सचा वापर होतो. अशावेळी खूप कालावधीपासून न वापरले गेलेले लिपस्टिक वितळवून व्हॅसलीनमध्ये मिक्स करून त्याचा लीपबाम म्हणून वापर करू शकता.