दिवाळीसाठी घर सजवताना वापरू शकता या काही हटके 5 आयडीया
प्रातिनिधिक प्रतिमा (photo credit : YouTube)

आपला आशियाना, आपले घर सजवायला कोणाला आवडत नाही. घराची सजावट, ठेवण यावरून घरातल्या लोकांची, त्यांच्या व्यक्तीमत्वाचीदेखील कल्पना येते. म्हणूनच प्रत्येकवेळी आपल्या घराची सजावट ही वेगळी, युनिक असावी याकडे आपला कल असतो. यात दिवाळी सारख्या सणावेळची सजावट ही तर फारच महत्वाची गोष्ट असते. घर छोटे असो वा मोठे सणासुदीच्या काळात घराची सजावट घरात येणाऱ्या प्रत्येकालाच प्रसन्न करते. घर सजवताना नेहमीच आपण काही टिपिकल गोष्टींचा वापर करतो, मात्र यावेळी दिवाळीसाठी घर सजवताना काही हटके कल्पना नक्कीच तुमच्या घराचा लूक बदलून टाकतील. चला तर पाहूया घर सजावटीच्या काही सोप्या आयडीयाज

दिवे – दिवाळी या दिव्यांचा सण आहे. दिवाळीला इतर गोष्टी नसल्या तर चालतील मात्र दिव्यांशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच या दिवाळीला घरात सजणाऱ्या दिव्यांना द्या थोडा पर्सनल टच. बाजारातून रॉ दिवे विकत आणून तुम्ही ते स्वतःच्या हाताने, वेगवेगळ्या रंगानी पेंट करू शकता. शक्यतो एकाच प्रकारचे दिवे वापरण्याऐवजी वेगवेगळ्या आकाराचे दिवे वापरा, जेणेकरून तुम्ही विविध रंगांच्या कल्पना या दिव्यांना रंग देताना वापरू शकता. असे स्वतः रंगवलेले दिवे तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना भेट म्हणूनही देऊ शकता.

photo credit : Pinterest

उश्यांचे अभ्रे – आजकाल मिनिमल रंगांचा ट्रेंड आहे. घराच्या भिंतींपासून ते उश्या-चादारांपर्यंत शक्यतो हलके आणि प्लेन रंग वापरले जातात. मात्र या दिवाळीला काही रंगीबेरंगी उश्यांचे अभ्रे तुम्ही वापरू शकता. अशा विविध रंगांच्या अभ्र्यांमुळे आणि थोड्या हेवी डिझाईनमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते आणि घरही भरल्यासारखे वाटते. याबाबतील तुम्ही स्वतः पांढऱ्या रंगाच्या कव्हरवर हवी तशी आणि  हव्या त्या रंगांची कलाकुसर करू शकता.

photo credit : dhgate.com

ग्रीन दिवाळी – यावेळच्या दिवाळीसाठी तुम्ही घरात लावता येणाऱ्या छोट्या शोच्या झाडांचा वापर करू शकता. छोट्या छोट्या कुंड्यात बसणारी झाडे, छोटे बोन्साय तुम्ही घरातल्या विविध कोपऱ्यात ठेऊ शकता. घरात मनीप्लांट असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे काचेच्या बाटलीत ठेऊन ते तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता. अशी झाडे तुम्ही लाईट्सचा वापर करून देखील सजवू शकता.

भिंतींचे टेक्शर -  भिंतींवरील टेक्शर हे तुमच्या घराला इतरांपासून थोडा वेगळा लूक देते. घरातल्या कोणत्याही एका भिंतीवर तुम्ही विविध प्रकारची टेक्शर काढू शकता. अशा टेक्शरवरील भिंतीवर लावलेले फोटोज किंवा अडकवण्याच्या इतर कोणत्याही सजावटीच्या गोष्टी (Wall hangings) फारच छान दिसतात.

काचेच्या बाटलीत लाईट्स – ही फार वेगळी आयडीया सध्या ट्रेंडमध्ये आहे. विविध रंगांच्या काचेच्या बाटलीत घातलेल्या लाईट्सच्या माळा घराला क्लासी लूक देतात. थोड्या उंचावर लटकावून ठेवलेल्या या लाईट्सच्या बाटल्यांमुळे तुम्हाला घरात इतर कोणत्याही प्रकाशाची गरज भासत नाही.

तसेच अशा काचेच्या बाटल्यांमध्ये तुम्ही मेणबत्तीदेखील सजवू शकता. मेणबत्त्यांचे अनेक प्रकार आणि आकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. फक्त बाटल्यांमध्येच नाही तर छोट्या छोट्या काचेच्या ग्लासमध्येदेखील तुम्ही मेणबत्त्या सजवून ठेऊ शकता.