वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये शनिवारी गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर आता पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रशासन अलर्ट झाले आहे. गर्दीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने आता प्रवाशांकडे असलेल्या सामानावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जर मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर संबंधित प्रवाशाला दंड आकारला जाणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीमध्ये प्रत्येक प्रवाशाला विनाशुल्क काही प्रमाणात सामान नेण्याची परवानगी आहे, परंतु स्कूटर आणि सायकली यांसारख्या वस्तू तसेच 100 सेमी x 100 सेमी x 70 सेमी पेक्षा जास्त आकाराच्या वस्तू मोफत नेता येणार नाहीत.
पश्चिम रेल्वे कडून सध्या नागरिकांना स्टेशन वर गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गरज असेल तरच स्टेशन वर येण्याचं आणि रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणेच येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 8 नोव्हेंबर पर्यंत हे नियम लागू असणार आहेत. दरम्यान गाडीमध्ये प्रत्येक क्लास नुसार मोफत सामान नेण्याच्या मर्यादेमध्ये बदल होणार आहे.
सणासुदीच्या काळात पार्सल बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना आणि सुरत येथील पार्सल कार्यालयांमध्ये ही वाढ दिसून येत आहे. गाड्यांमध्ये लोड करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर ठेवलेल्या पार्सलच्या प्रमाणामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. नक्की वाचा: Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या गर्दीचा सामना करण्यासाठी सुरु केल्या अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन्स .
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता, ट्रेनच्या नियोजित प्रस्थानापूर्वी प्लॅटफॉर्मवर पार्सल जास्त काळ रचू नयेत, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.