सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जरी वाढले असले तरी, दररोज जगात लाखोंच्या घरात नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अजूनही भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन (Lockdown) सुरू आहे. अनेक देशांनी अजूनही आपल्या सीमा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सुरु केल्या नाहीत, प्रवासावर बरेच निर्बंध आहेत. अशात भारतामध्ये एका एजन्सीने दिल्ली (Delhi) ते लंडन (London) दरम्यान टूर प्लॅन ऑफर केली आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रवास विमानाने नाही तर चक्क बसने (Bus) होणार आहे. विश्वास न बसण्यासारखी हो गोष्ट आहे मात्र ही खरी आहे.
गुरुग्राममधील एका ट्रॅव्हल कंपनीने 15 ऑगस्ट रोजी 'बस टू लंडन' नावाची ट्रिप आयोजित केली आहे. ही सहल 70 दिवसांची आहे, ज्यामध्ये प्रवाशांना दिल्लीहून लंडनसाठी रस्ते मार्गाने नेले जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ट्रॅव्हल कंपनीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. कंपनीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पोस्टनुसार, या 70 दिवसात लोक 'रोड' द्वारे 20,000 किमी अंतर पार करतील.
युकेला पोहोचण्यापूर्वी ही बस म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, चेक प्रजासत्ताक, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम आणि फ्रान्स अशा 18 देशांमधून प्रवास करेल. 2021 मध्ये ही बस दिल्लीहून लंडनसाठी निघेल. या सहलीमध्ये केवळ 20 प्रवासी भाग घेऊ शकतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व सीट्स या बिझनेस क्लास असतील. प्रवासादरम्यान 20 प्रवाश्यांव्यतिरिक्त चालक, सहायक ड्रायव्हर, आयोजक कंपनीचा एजंट आणि एक मार्गदर्शक बसमध्ये उपस्थित असतील.
18 देशांमधून ही बस प्रवास करणार असल्याने, सर्व देशांमध्ये गाईड बदलले जातील, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. दिल्ली ते लंडन या सहलीमध्ये प्रवाशांना 10 देशांचे व्हिसा घ्यावा लागेल, परंतु येथे कंपनी प्रवाशांच्या व्हिसाचीही व्यवस्था करेल. अनेकांना एकाच वेळी विविध देशांना भेट द्यायची आवड असते, अशा लोकांसाठी हा अनुभव खास ठरू शकतो. या प्रवासात राहण्याची सोय 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेलमध्ये केली जाईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरस आणि Lockdown काळात प्रवास करताना काय काळजी घ्याल?)
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या या बसच्या तिकिटासाठी प्रवाशांना 15 लाख रुपये द्यावे लागतील. जे लोक एकाचवेळी 15 लाख रुपये घेण्यास असमर्थ आहेत, ते हप्त्यांमध्येही भाडे भरू शकतात. ट्रॅव्हल कंपनीचे संस्थापक सांगतात की त्यांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 2017, 2018 आणि 2019 मध्ये देखील बसने दिल्लीहून लंडनचा प्रवास केला आहे.