Best Hotel In The World: राजस्थानच्या जयपूरमधील Rambagh Palace ठरले जगातील सर्वोत्तम हॉटेल; जाणून घ्या मिळणाऱ्या सेवा आणि दर
Rambagh Palace (संग्रहित संपादित प्रतिमा)

राजस्थानचा शाही थाट जगभरात पसंत केला जात आहे. अनेक परदेशी पर्यटक त्यांच्या भारत भेटीवेळी राजस्थानमधील अनेक ठिकाणांना आवर्जून भेट देतात. आता राजस्थान राज्यातील जयपूरमधील रामबाग पॅलेस (Rambagh Palace) हे जगभरातील पर्यटकांनी सर्वाधिक पसंतीचे हॉटेल (Best Hotel In The World) म्हणून निवडले आहे. ट्रिप अॅडव्हायझर या प्रवासाशी संबंधित सेवा देणाऱ्या वेबसाइटने जगातील सर्वात पसंतीच्या हॉटेल्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये रामबाग पॅलेस हे पहिल्या क्रमांकावर आहे.

तब्बल 190 वर्षे जुन्या या राजवाड्याचे रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. हे हॉटेल ताज हॉटेल्स ग्रुपद्वारे पंचतारांकित हॉटेल म्हणून चालवले जात आहे. हे हॉटेल हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 'ज्वेल ऑफ जयपूर' म्हणूनही ओळखले जाते. ट्रिप अॅडव्हायझर्स ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्स, 2023 द्वारे रामबाग पॅलेस हॉटेलला जगातील सर्वात आलिशान हॉटेल म्हणूनही निवडण्यात आले आहे. वेबसाईटला भेट देणाऱ्यांनी नमूद केलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो.

या यादीत 37 हॉटेल्सचा समावेश करण्यात आला असून, त्यात रामबाग पॅलेसला पहिले स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये मालदीवमधील बॉलीफुशी बेटावरील ओझेन रिझर्व्ह बॉलीफुशी (Ozen Reserve Bolifushi) हॉटेल दुसऱ्या स्थानावर आहे, तर ब्राझीलच्या ग्रामाडो येथील कॉलिन डी फ्रान्स हॉटेल (Hotel Colline de France) तिसऱ्या स्थानावर आहे. लंडनमधील शांग्री-ला द शार्ड चौथ्या, तर रिट्झ-कार्लटन, हाँगकाँग पाचव्या स्थानावर आहे.

त्यानंतर यादीत दुबईतील जेडब्ल्यू मॅरियट मार्क्विस हॉटेल, इस्तंबूलमधील रोमान्स इस्तंबूल हॉटेल, ग्रीसमधील इकोस डासिया, स्पेसमधील इकोस अंडालुसिया आणि इंडोनेशियामधील पद्मा रिसॉर्ट उबुद यांचा क्रमांक लागतो.

दरम्यान, रामबाग पॅलेस हे भारतामधील सर्वात महागडे हॉटेल समजले जाते. हा राजवाडा 1835 मध्ये बांधला गेला होता, त्यानंतर 1925 मध्ये रामबाग पॅलेस हे जयपूरच्या महाराजांचे कायमचे निवासस्थान बनले. त्यानंतर 1957 मध्ये महाराजा सवाई मान सिंह यांनी या महालाचे आलिशान हॉटेल बनवले. हा महाल 47 एकरमध्ये पसरलेला आहे. ज्यामध्ये अनेक आलिशान सूट, संगमरवरी कॉरिडॉर, हवेशीर व्हरांडा आणि भव्य बागा आहेत. (हेही वाचा: Dholavira: भारताला लाभले 40 वे जागतिक वारसा स्थळ; जाणून घ्या या हडप्पाकालीन शहराबद्दल)

त्याच्या वेगवेगळ्या खोल्या आणि सूट्सचे भाडे अडीच लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत आहे. यात रॉयल डायनिंग रूम आणि मास्टर बेडरूमसह ड्रेसिंग एरिया देखील आहे. या ठिकाणी पोलो गोल्फ, जिवा ग्रांडे स्पा, जकूझी, इनडोअर, आउटडोअर स्विमिंग, वॉकिंग ट्रेल, फिटनेस हब, योगा आदी सुविधाही आहेत. या हॉटेलमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. ट्रिप अॅडव्हायझरने म्हटले आहे की, सुमारे 5,751 लोकांनी याला पंचतारांकित रेटिंग दिले आहे.