Diwali 2018 :  'भाऊबीजे'ला बहिणीला खुश करण्यासाठी ओवाळणी म्हणून देऊ शकता या काही हटके गोष्टी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: File Image)

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. हेच कारण आहे की या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यादिवशी बहिणीच्या सानिध्यात राहण्याने, तिच्या हाताने बनलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतो. आपल्याकडेही हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी बहिण भावाकडून आपली हक्काची ओवाळणीदेखील घेते. प्रत्येक वर्षी बहिणीला या दिवशी काही स्पेशल गिफ्ट देणे ही भावांसाठी फार मोठी गोष्टी असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बहिणीला ओवाळणी देण्यासाठी काही हटके आयडीयाज सांगणार आहोत, ज्यामुळे बहिणही खुश होईल आणि तुम्हालाही नक्की काय गिफ्ट द्यावे याचा जास्त विचार करावा लागणार नाही.

डिझाईनर पर्स – बहिण लहान असो वा मोठी आजकाल पर्स घेतल्याशिवाय कोणतीही मुलगी घराबाहेर पडत नाही. त्यामुळे यावर्षी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी ही फार चांगली गोष्ट ठरू शकते. आजकाल बॅगपॅक आणि पर्स अशा दोन्ही प्रकारे वापरता येतील अशा बॅग्ज बाजारात उपलब्ध आहेत. कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर मॅच होणारी अशी बॅग पाहून बहिण नक्कीच खुश होईल. तसेच वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईनच्या, प्रकारच्या पर्सेसचाही तुम्ही ऑप्शन म्हणून विचार करू शकता. सध्या बाजारात Handbag Organizer हा ट्रेंड फारच लोकप्रिय आहे.

हेल्मेट – तुमची बहिण जर का थोडी मोठी असेल आणि ती जर का दुचाकी चालवत असेल तर हेल्मेटपेक्षा दुसरे चांगले गिफ्ट असू शकत नाही.  हेल्मेटसोबत तुम्हे ग्लव्ह्जदेखील गिफ्ट देऊ शकता. तसेच गाडी चालवताना उपयोगी पडतील असे सनग्लासेसदेखील तुम्ही या गीफ्टमध्ये क्लब करू शकता.

जिमचे कपडे आणि स्पोर्ट शूज – आजकाल फिटनेस हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.  मुलांप्रमाणे मुलीदेखील जिममध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत करताना दिसतात. त्यामुळे बहिणीला तुम्ही जिमचे कपडे, सिपर आणि स्पोर्ट शूज देऊन खुश करू शकता. भलेही तुमची बहिण जिमला जात नसेल मात्र स्पोर्ट शूज ती कधीही कुठेही वापरू शकते.  तसेच मुली स्वतःसाठी अशा गोष्टी घेण्याचे टाळतात त्यामुळे गिफ्ट म्हणून या गोष्टी खूप चांगला ऑप्शन ठरू शकतो.

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स – इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही काळाची गरज बनली आहे. तसेच अशी उपकरणे तुम्हाला  ट्रेंडी आणि क्लासी लूकही मिळवून देतात. त्यामुळे यावर्षीच्या भाऊबीजेला बहिणीला काही गॅजेट्स फिफ्ट करून तिला टेक सॅव्ही बनवू शकता. यासाठी तुम्ही हेडफोन्स, आयवॉच/स्मार्टवॉच, आयपॉड, आयकेटल, स्पीकर्स, पोर्टेबल चार्जर इत्यादी गोष्टींचा विचार करू शकता.

पर्सनलाईझ कॉफी मग, उश्या, बेडशीट – आजकाल बाजारात विविध गोष्टींवर आपल्या प्रियजनांचे फोटो छापून मिळतात. अशा काही गोष्टींवर आपल्या बहिणीचे विविध फोटो प्रिंट करून तुम्ही ते तिला गिफ्ट देऊ शकता. मुलीना अशा पर्सनलाईझ गिफ्ट्स फारच आवडतात. त्यासाठी तुम्ही कॉफी मग, उश्यांचे कव्हर, बेडशीट, फोटोफ्रेम अशा वस्तू वापरू शकता.

डायमंड व्रेसलेट आणि नेकलेस – आजकालच्या मुली विविध समारंभात सोन्याच्या दागिन्यांपेक्षा डिझाईनर दागिन्यांना पसंती देताना दिसतात. अशावेळी डायमंडचे कोणतेही दागिने गिफ्ट म्हणून देण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. हे दागिने कोणत्याही कपड्यांवर सुट होतात आणि यामुळे मिळणारा लूकदेखील फारच क्लासी असतो.