गणेशोत्सव हा आजकाल मोठ्या धूमधामीमध्ये साजरा केला जातो. घरगुती गणेशोत्सवामध्ये जितकी धम्मल, मस्ती असते तितकीच मज्जा किंबहूना त्याहून थोडी अधिक मज्जा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये केली जाते. मुंबईतील 'या' लोकप्रिय गणपती मंडळांना नक्की भेट द्या !
गणेशोत्सवाइतकेच गणेश विसर्जन मिरवणूकींकडे लोकांचे लक्ष लागलेले असते. मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांचे गणपती धामधुमीत, तब्बल 12-20 तासांच्या मिरवणूकींनंतर विसर्जित केले जातात. त्यामुळे अशा मिरवणूकींमध्ये तुम्हीही सहभागी होणार असाल ? तर लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने गणेशोत्सव काळात कोणती काळजी घ्याल ?
गणेशोत्सवामध्ये गर्दीच्या ठिकाणी धक्काबुक्की, चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घ्या. प्रामुख्याने लहान मुलांना एकटं सोडू नका. गर्दीत चुकामूक झाल्यास कुठे भेटाल हे आधीच ठरवून ठेवा म्हणजे दोघंही निश्चिंत रहाल.
गर्दीच्या ठिकाणी फार मौल्यवान दागिने, पैसे, महागडी गॅजेट्स घेऊन जाणं टाळा. पाकिटमारांपासून सावधान रहा.
गर्दीच्या गणेश मंडळात तसेच गणेश विसर्जनादरम्यान तुम्ही ज्यामध्ये आरामदायी असाल असेच कपडे निवडा. मिरवणूकीमध्ये नाचणार असाल तर मुलींनी कपड्यांची निवड करताना विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. अति तंग किंवा खोल गळ्याचे कपडे टाळावेत.
फटाके उडवाताना पुरेशी मोकळी जागा पाहूनच ते पेटवा. फटाक्यांची माळ लावलेल्या ठिकाणांपासून लहान मुलांना दूर ठेवा.
गणेश मूर्तींचं विसर्जन करताना खोल पाण्यात जाण्याचा मोह टाळा. तुम्हांला पोहता येत नसल्यास तेथे नेमलेल्या सुरक्षा जवान, स्वयंसेवकांच्या हातात मूर्ती द्या.
इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असाल तर तलाव, समुद्रासारख्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा कृत्रिम तलावामध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन करा.
अनेक गणेश विसर्जन मिरवणूका या तासन तास चालतात अशावेळेस चालण्याच्या, नाचण्याच्या उत्साहात तुम्ही डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या. घराबाहेर पडताना तुमच्याजवळ पाण्याची बाटली ठेवा.