याआधी असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यामध्ये म्हटले आहे की, ठरवून केलेल्या सेक्सपेक्षा (Planned Sex) उत्स्फूर्तपणे झालेला सेक्स (Spontaneous Sex) हा नेहमीच चांगला असतो. मात्र आता यॉर्क युनिव्हर्सिटीच्या (York University) जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमध्ये (Journal of Sex Research) प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, नियोजन करून केला जाणारा सेक्स हा देखील उत्स्फूर्त सेक्ससारखेचा कामुक आणि समाधानकारक असू शकतो.
रोमँटिक संबंध आणि लैंगिक समस्यांमध्ये तज्ञ असलेल्या मनोचिकित्सक कॅटरिना कोवासेविक म्हणतात की, सेक्ससाठी नियोजन करणे म्हणजे ठराविक वेळेलाच सेक्स करावा असे आम्ही सांगत नाही. परंतु दोघेही जण कधी वेळ काढू शकतात याबाबत चर्चा करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात.
यासाठी संशोधकांनी दोन अभ्यास केले. यातील पहिल्या अभ्यासात रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असणारे 300 सहभागी सामील झाले होते. त्यांनी ऑनलाइन सर्वेक्षणात प्रश्नांची उत्तरे दिली. दुसऱ्या अभ्यासात 100 हून अधिक जोडप्यांनी त्यांच्या रोमँटिक आणि लैंगिक जीवनाबद्दल तीन आठवड्यांच्या दैनंदिन सर्वेक्षणांना प्रतिसाद दिला. नियोजित सेक्स आणि उत्स्फूर्त लैंगिक संबंधांबद्दल लोकांच्या असलेल्या विश्वासाचा संबंध त्यांच्या सेक्सनंतरच्या समाधानाशी आहे का हे संशोधकांना पाहायचे होते.
पहिल्या अभ्यासात असे दिसून आले की, उत्स्फूर्तपणे घडलेल्या सेक्समध्ये अधिक समाधान मिळाल्याचे सहभागींनी सांगितले. परंतु दुसर्या अभ्यासात सेक्स हा नियोजित होता की नाही याचा सेक्सनंतर मिळणाऱ्या समाधानावर कोणताच परिणाम दिसून आला नाही. कोवासेविक यांनी खुलासा केला की, 'आमच्या नवीन अभ्यासात असे आढळून आले की अनेक लोक 'उत्स्फूर्त सेक्स' या संकल्पनेवर विश्वास ठेवतात, मात्र त्यांचा शेवटचा सेक्स हा नियोजित किंवा अनियोजित होता याचा सेक्सनंतर मिळणाऱ्या समाधानाशी संबंध नव्हता.’ (हेही वाचा: Sex Addiction: लैंगिक व्यसन म्हणजे काय? तुम्हालाही आहे सेक्स अॅडिक्शन? जाणून घ्या लक्षणे)
यॉर्क युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापक एमी मुईस यांनी सांगितले की, आमच्या दोन अभ्यासांमध्ये आम्हाला असे ठोस समर्थन मिळाले नाही, ज्याद्वारे हे सिद्ध होईल की, नियोजित सेक्सपेक्षा उत्स्फूर्त सेक्सचा अनुभव अधिक समाधानकारक वाटतो. संशोधकांनी असेही नमूद केले की, आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाचे आणि आनंददायक क्षण हे नियोजित असतात- जसे की सुट्ट्या किंवा करिअर. त्याच प्रकारे नियोजित लैंगिक संबंधदेखील तितकेच समाधान देऊ शकतात जितके एखादा उत्स्फूर्त सेक्स देतो.