सांधेदुखी (Photo credits: Pexels)

आर्थराइटिस म्हणजे सांधेदुखी. याचा परिणाम प्रामुख्याने गुडघे, घोटे, मनगट, हाता-पायांची बोटे या भागात जाणवतो.  सांधेदुखीमुळे जगातील अनेक लोक त्रस्त आहेत. सांधेदुखीच्या वेदना अतिशय तीव्र असल्यामुळे चालताना खूप त्रास होतो. वाढत्या वयात हा त्रास अधिक जाणवतो. यासाठी आहारातील पथ्यं पाळणं गरजेचं आहे. वर्ल्ड आर्थराइटिस डे निमित्त जाणून घेऊया सांधेदुखी असलेल्यांनी कोणते पदार्थ टाळावेत...

आर्थराइटिसमध्ये नेमके काय होते?

आर्थराइटिसमध्ये शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे सांध्यात सूज निर्माण होते. परिणामी वेदना जाणवू लागतात. थंडीत तर या वेदना अधिक तीव्र होतात. यावर औषधोपचार करण्याबरोबरच आहारातील पथ्यंही पाळणं आवश्यक आहे. म्हणून आर्थराइटिस असलेल्यांनी हे पदार्थ खाणे टाळा.

कोणते पदार्थ टाळावेत?

मासे आणि मांस

आर्थराइटिस असलेल्यांनी मांस, मासे खाणे टाळावे. कारण त्याच्या सेवनाने वेदना अधिक वाढू शकतात. मांस आणि माशांमध्ये अधिक प्रमाणात प्यूरिन असते. त्यामुळे शरीरात अधिक युरिक अॅसिड तयार होते.

साखरयुक्त पदार्थ

सांधेदुखी असलेल्यांनी साखरयुक्त पदार्थ त्याचबरोबर गोड खाणे टाळावे. साखरेच्या अधिक सेवनाने शरीरातील प्रोटीन्सचा ऱ्हास होतो आणि सांधेदुखीचा त्रासही वाढतो.

दुग्धजन्य पदार्थ

डेअरी प्रॉड्क्स सांधेदुखीचा त्रास वाढवतात. पनीर, बटर यात असलेल्या प्रोटीन्समुळे सांध्याच्या आसपासचे पेशी प्रभावित होतात आणि वेदना वाढू लागतात.

अल्कोहोल आणि सॉफ्ट ड्रिंक्स

सांधेदुखी असलेल्यांनी मद्यपान आणि सॉफ्ट ड्रिंक्स दूर राहणेच त्यांच्या फायद्याचे ठरेल. मद्यपानामुळे शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढते. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये फ्रक्टोस नावाचा घटक असतो, त्यामुळे युरीक अॅसिडचे प्रमाण वाढण्यास मदत होते. एका संशोधनानुसार, फ्रक्टोसचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास सांधेदुखीचा धोका दुप्पटीने वाढतो.

टॉमेटो

सांधेदुखीच्या वेदना वाढवणारा अजून एक पदार्थ म्हणजे टॉमेटो. टॉमेटोत असलेले रासायनिक घटक सांधेदुखीच्या वेदना वाढवतात. त्याचबरोबर सूज निर्माण होते. त्यामुळे टॉमेटोचे सेवन कमी करणेच योग्य ठरेल.