Coronavirus (Photo Credits: Pixabay)

सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणू (Coronavirus) बाबत रिसर्च होत आहे. लस धोधण्याचा प्रयत्न चालू आहे, औषध निर्मिती सुरु आहे. अजूनही या विषाणूबाबत पूर्णतः माहिती आपल्याला मिळाली नाही. अशात कोरोना विषाणूंशी लढत असलेल्या जगासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हाँगकाँग विद्यापीठाच्या (University of Hong Kong) संशोधनात असे दिसून आले आहे की, डोळे (Eyes) हे मानवी शरीरात कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याचा एक प्रमुख स्त्रोत बनला आहे. इतकेच नाही तर, सार्स आणि बर्ड फ्लूच्या तुलनेत कोरोना विषाणू तोंड, नाक आणि डोळ्यांद्वारे 100 पट वेगाने शरीरात प्रवेश करीत असल्याचे दिसून आले आहे.

हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या डॉ. मायकेल चॅनची-वाई यांच्या नेतृत्वात असलेल्या टीमने, कोरोनो विषाणू दोन ठिकाणाहून मानवांमध्ये प्रवेश करू शकेल असा जगाला पहिला पुरावा दिला आहे. संशोधकांचा हा अहवाल द लान्स रेस्पिरीट मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, कोविड-19 विषाणूची पातळी सार्सच्या तुलनेत अतिशय वेगाने मानवांमध्ये संक्रमित होत आहे. डॉ. चॅन यांनी सांगितले की त्यांच्या टीमने मानवी श्वसन प्रणाली आणि डोळ्यांच्या पेशींची तपासणी केली. त्यात आढळले आहे की, सार्स-बर्ड फ्लूपेक्षा SARS-Cov-2 विषाणू मानवी डोळा आणि वरच्या श्वसनमार्गाद्वारे अधिक वेगाने संक्रमित होत आहे. संसर्गाचे हे प्रमाण 80 ते 100 पट जास्त आहे. (हेही वाचा: Lockdown: लॉकडाऊन योग्य पद्धतीने नाही हटवला तर समस्या गंभीर- जागतिक आरोग्य संघटना)

या संशोधनात लोकांना डोळ्यांना स्पर्श न करण्याचा आणि वेळोवेळी साबणाने हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी, कोरोना विषाणू स्टील, प्लास्टिक आणि जमिनीवर 7 दिवस जिवंत राहू शकतो, असा शोध लावला होता. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात 2,70,711 लोक मरण पावले आहेत. अमेरिका या साथीच्या रोगाचा सर्वात मोठा बालेकिल्ला बनला आहे. इथे कोविड-19 मुळे जवळपास 77 हजार लोक मरण पावले आहेत आणि 12,92,623 लोकांना या साथीच्या आजाराचा संसर्ग झाला आहे.