चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मागील महिनाभरापासून दहशत पसरली आहे. आता आशिया खंडासोबतचा अमेरिकेमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. चीनमध्ये मागील काही दिवसामध्ये एका अज्ञात विषाणूची लागण होऊन रूग्णांच्या संखेमध्ये वाढ होत असल्याने आता चीन सोबत आरोग्य संघटनेकडूनही 'कोरोना विषाणू' बाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चीनमध्ये सध्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 291 रूग्णांना कोरोना व्हायरस संबंधित 'न्युमोनिया' या आजारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोना विषाणू का पसरवतोय दहशत?
कोरोना या व्हायरसमुळे रूग्णाला सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. त्यामुळे The World Health Organization (WHO) ने 31 डिसेंबर 2019 दिवशी याबाबत अलर्ट जारी केला होता. चीन मध्ये 2013 मध्ये 'सार्स'ने देखील अशाच प्रकारे दहशत पसरवली होती. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.
चीन व्यतिरिक्त थायलंड, जपान आणि अमेरिकेमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत. दरम्यान हे रूग्ण चीन मधून त्यांच्या मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आता या आजाराबाबत दहशत वाढत आहे.
15 जानेवारी दिवशी चीन मधील आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वुहानमध्ये माणसांच्या संपर्कातून विषाणूंची लागण झाल्याची ठोस माहिती समोर आलेली नाही मात्र त्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पुढील दहा दिवसांतच म्हणजे 25 जानेवारीला चायनीज नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोकं देशभरात एकत्र जमले होते. त्यानंतर वुहान पाठोपाठ इतर शहरांतही रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरणारी दहशत ही सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी असल्याचं जाहीर करण्याबाबत विचार सुरू केला आहे. आज आरोग्य संघटनेच्या होणार्या बैठकीमध्ये त्याबाबतचा विचार केला जाणार आहे.