सुरुवातीला डेंग्यूच्या उपचारासाठी विकसित केलेल्या ‘क्लेव्हिरा' (Clevira) या अँटी-व्हायरल औषधाचा उपयोग आता कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) संक्रमित असलेल्या, मात्र सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारांमध्ये एक सहायक थेरपी म्हणून केला जाऊ शकतो. या औषधाचे निर्माते, अॅपेक्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड (Apex Laboratories Private Limited) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, सलग 14 दिवस जेवणानंतर तोंडावाटे हे औषध घेतल्यास ते प्रभावी ठरू शकते. हे औषध दिवसातून दोनदा घेतले पाहिजे.
क्लेव्हिरा या अँटी-व्हायरल औषधाला हलके ते मध्यम लक्षणे असणा-या कोरोना रुग्णांसाठी सहाय्यक उपचार पद्धती म्हणून नियामक मान्यता प्राप्त झाली असल्याचे, चेन्नईस्थित औषधनिर्माण कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, क्लेव्हिरा हे औषध प्रामुख्याने डेंग्यूच्या रूग्णांच्या उपचारांसाठी 2017 मध्ये विकसित करण्यात आले होते. गेल्या वर्षी देशात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, हे औषध कोरोना संसर्गावर उपचार म्हणून समाविष्ट केले गेले. हे औषध प्रति गोळी 11 रुपये किंमतीवर देशात उपलब्ध आहे. (हेही वाचा: Plasma Donation: कोरोनावर मात केल्यानंतर किती दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकतात? त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? जाणून घ्या सविस्तर)
निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'या औषधाच्या गेल्या वर्षी 100 लोकांवर क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या आणि त्याचे निकाल 'समाधानकारक' व 'आश्वासक' होते. फार मोठ्या प्रमाणावर तपास आणि सखोल चर्चेनंतर हे औषध सौम्य ते मध्यम लक्षणे असणा-या कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून मंजूर केले गेले आहे.' आयुष मंत्रालयाच्या नियामकाने ही मंजुरी दिली असून, देशातली या प्रकारची ही पहिली मंजुरी आहे. तसेच, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) आणि आंतरशाखात्मक तांत्रिक पुनरावलोकन समिती (आयटीआरसी) यांनीही याची चाचणी घेतली आहे.
कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे व्यवस्थापक सी आर्थर पाल म्हणाले की, क्लेव्हिरा औषध यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रूग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि इतर औषधांसह हे देण्यास काहीच अडचण नाही. त्यांनी पुढे सांगितले की, हे औषध दोन वर्षांच्या मुलापासून ते सर्व वयोगटातील रुग्णांना दिले जाऊ शकते.