कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचे विघ्न डोक्यावर घोंगावत असतानाच आज भक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळात लाडके बाप्पा (Shree Ganesh) विराजमान झाले आहेत. कोरोनाचे संकट लवकर टळावे, हीच कामना मनात ठेवून आणि उत्साहात कुठेही कमतरतान ठेवता भक्तांनी श्री गणेशाचे स्वागत केले आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भक्ताना श्री गणेशाचे ऑनलाईन दर्शन (Online Darshan) घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना मंडळात भेट देण्यास बंदी घातली आहे आणि मंडाळातून केवळ ऑनलाइन दर्शनाला परवानगी दिली जाईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने मुंबई पोलिसांनी गणेश उत्सवादरम्यान 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कलम 144 लागू केले आहेत. या कालावधीत शहरात कोणत्याही मिरवणुकीला परवानगी दिली जाणार नाही आणि भक्तांनाही सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देण्याची परवानगी नाही. लोक ऑनलाइन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मंडाळात स्थापित केलेल्या गणेश मूर्तींचे 'दर्शन' करू शकतात, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हे देखील वाचा- Varsha Bungalow Ganpati 2021: महाराष्ट्र मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान 'वर्षा' वर गणपतीचं आगमन; पहा फोटोज
मुंबईत सुमारे 12,000 सार्वजनिक मंडळे आणि सुमारे दोन लाख घरे आहेत जिथे गणपतीच्या मूर्ती बसवल्या जातात. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी पीटीआयला सांगितले की गेल्या वर्षी केवळ 90 टक्के मंडळांनीच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता उत्सव साजरा केला होता. तर, यावर्षी सर्व मंडळे गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.