Diwali 2018 : दिवाळीत फराळाला असा द्या हेल्दी ट्विस्ट !
दिवाळी फराळ i प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Wikimedia Commons)

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की, फराळ आलाच. घरोघरी केला जाणारा फराळ चवीला रुचकर लागत असला तरी आरोग्याच्या दृष्टीने फार हितकारक नसतो. तसंच आजकाल मधुमेह, रक्तदाब, स्थुलता या आरोग्याच्या समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. त्यामुळे दिवाळीच्या फराळावर ताव जरा बेतानेच मारावा लागतो. पण आपल्या या पारंपरिक पदार्थांना काहीसा हेल्दी ट्विस्ट दिला तर..? मिठायांवरील चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना ? या'4' सोप्या टेस्टने घरच्या घरीच ओळखा

त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही ते फायदेशीर ठरेल आणि हे हेल्दी टेस्टी फराळाचे पदार्थ दिवाळीचा आनंद वाढवतील. तर पाहुया हेल्दी फराळाच्या रेसिपीज... हे ही वाचा :  दिवाळीच्या उत्साहात हेल्दी राहण्यासाठी खास '6' टिप्स !

खजूर अक्रोड करंजी

साहित्य

1 कप गव्हाचे पीठ

पाव कप ओट्सचे पीठ

अर्धा कप कोमट दूध किंवा पाणी

3 चमचे क्रश काळे खजूर

1 चमचा शेंगदाण्याचा कूट

2 चमचे तूप

कृती

-एका भांड्यात गव्हाचे पीठ, ओट्सचे पीठ आणि चमचाभर तूप घाला. त्यानंतर त्यात अर्ध कप पाणी किंवा दूध मिसळा आणि पीठ अगदी घट्ट किंवा अगदी सॉफ्ट न करता मळून घ्या.

-फ्राईंग पॅनमध्ये 1 चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात खजूर, अक्रोड आणि शेंगदाण्याचा कूट घाला. 5 मिनिटे हे मिश्रण नीट मिक्स करा.

-त्यानंतर मळलेल्या पीठाचे दोन समान भाग करा. लहान लहान गोळे करुन त्याच्या गोलाकार लाट्या लाटा. त्यात खजूर, अक्रोडाचे मिश्रण घालून करंजी बनवा.

-त्यानंतर करंजी 15-20 मिनिटांसाठी ओव्हनमध्ये बेक करा.

मल्टीग्रेन शंकरपाळी

साहित्य

2 चमचे तांदळाचे पीठ

2 चमचे मुगडाळीचे पीठ

2 चमचे गव्हाचे पीठ

2 चमचे सोया पीठ

मसाला

लाल मिरची पावडर

जिरे पावडर

धने पावडर

ऑरिगॅनो

मीठ

कृती

-वरील सर्व पीठं एकत्र करा. त्यात मसाला, ऑरिगॅनो, लाल मिरची पावडर, जिरे पावडर आणि धने पावडर घाला. पाणी घालून त्याचे कणीक मळून घ्या.

-मळलेलं कणीक 5-10 मिनिटे झाकून ठेवा.

-त्यानंतर त्याची मोठी लाटी लाटून चिरणीने शंकरपाळ्या पाडा.

-शंकरपाळ्या 10 मिनिटांसाठी 180 डिग्रीवर ओव्हनमध्ये बेक करा.

चिवडा

कृती

1 कप रोस्डेट पोहे

2 चमचे तेल

पाव कप रोस्डेट शेंगदाणे

1 चमचा मोहरी

2-3 हिरव्या मिरच्या

1-2 चमचे हळद

1 चमचा हिंग

कडीपत्ता

अर्धा चमचा साखर

मीठ चवीनुसार

साहित्य

-पॅनमध्ये तेल घाला. तेल थोडं गरम झाल्यावर त्यात मोहरी, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, हिंग, हळद आणि शेंगदाणे घाला. 2-5 मिनिटं हे मिश्रण तेलात परतून घ्या.

-त्यानंतर त्यात मीठ आणि साखर घाला.

-मग पोहे घालून मिश्रण नीट मिक्स करा.

सुकामेवा लाडू

साहित्य

2 चमचे क्रश केलेले काळे खजूर

1 चमचा बदाम (क्रश)

1 चमचा शेंगदाणे (क्रश)

1 चमचा अक्रोड (क्रश)

1 चमचा भाजलेले तीळ

2 चमचे दूध

कृती

सर्व क्रश केलेले नट्स एकत्र करा. त्यात दूध घाला आणि नीट मिक्स करा. त्या मिश्रणाचे लहान लहान लाडू वळा.

चकली

चकलीच्या भाजणीचे साहित्य

1 कप तांदूळ

अर्धा कप चणाडाळ

पाव कप उडीद डाळ

पाव कप ज्वारी

अर्धा कप मूगडाळ

10-15 ग्रॅम पोहा

20 ग्रॅम धने डाळ

20 ग्रॅम गहू

20 ग्रॅम जीरे

20 ग्रॅम साबुदाणे

हे सर्व पदार्थ वेगवेगळे 5-10 मिनिटं भाजून घ्या आणि थंड करुन दळून त्याचे पीठ करा.

इतर साहित्य

2-3 चमचे लाल मिरची पावडर

1 चमचा हळद

1 चमचा ओवा

3 चमचे तीळ

मीठ चवीनुसार

पाणी (गरजेनुसार)

कृती

-पॅनमध्ये पाणी, मसाले आणि 1 चमचा तेल घालून गरम करा. पाणी उकळायला लागल्यानंतर त्यात भाजणीचे पीठ घालून नीट मिक्स करा.

-त्यानंतर मिश्रण 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवा.

-त्यानंतर चकलीच्या साच्याला आतून तेल लावा आणि पीठ त्यात घाला.

-चकल्या पाडा.

-त्यानंतर 180 डिग्रीवर 20-30 मिनिटांसाठी ओव्हन प्रीहिट करुन घ्या आणि मग त्यात चकल्या 10 मिनिटे बेक करा.

यंदाच्या दिवाळीला हेल्दी फराळाच्या या रेसिपीज नक्की ट्राय करा.