मुंबई (Mumbai) येथील वांद्रे परिसरात असलेल्या आणि गजबजलेल्या हिल रोडवरील (Bandra West Hill Road) सुमारे 70 वर्षे जुनी इमारत पाडण्यात आली आहे. याच इमारतीमध्ये लोकप्रिय मामागोटो रेस्टॉरंट (Mamagoto Restaurant) आहे. त्यामुळे असंख्य खवय्ये आणि या इमारतीच्या साक्षीदारांच्या स्मृतींसह ही इमारत जमीनदोस्त झाली आहे. हिल रोड येथील रस्ता रुंदीकरण (Hill Road Widening) आणि रस्ता मूळ रुंदीवर आणण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईचा भाग म्हणून ही इमारत शुक्रवारी पाडण्यात आली. या भागात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हा रस्ता रुंदावत आहे.
हिल रोड रुंदीकरणाचा उपक्रम
BMC दप्तरी असलेल्या अधिकृत नोंदिनुसार, हिल रोडची अधिकृत रुंदी 27 मीटर आहे, परंतु जुन्या रचनेमुळे रस्ता जवळपास 14 मीटर कमी होऊन तो फक्त 13 मीटर इतका उरला होता. ज्यामुळे मुंबई शहातील वाहतूक सुरळीत न राहता उलट अडथळ्यांना हातभार लागला होता. सहाय्यक महापालिका आयुक्त विनायक विसपुते म्हणाले, "या इमारतीत 12 व्यावसायिक युनिट्स आणि दोन निवासी युनिट्स आहेत. या सर्वाना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 15 जून रोजी अंतिम नोटीस देण्यात आली होती, ज्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी पाडकाम निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. रस्त्यावरील अडथळे दूर करुन तो मोकळा केल्यावर वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असा विश्वासही पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Mumbai Vehicle Count: मुंबई शहरातील वाहनसंख्या 48 लाखांच्याही पुढे, गर्दी आणि प्रदुषणामुळे मानवी आरोग्याबाबत चिंता)
पुनर्वसन आणि समुदाय प्रभाव
बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमारत पाडल्यामुळे बाधित झालेल्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. काही रहिवासी वांद्रे येथे राहतात आणि इतर कांदिवली येथे स्थलांतरित झाले आहेत. वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांनी रस्ता रुंदीकरणाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, "परिसरातील वाहतूक कोंडी कमी करणे याला प्राधान्य दिले गेले आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून हिल रोडवरील विविध अडथळे पद्धतशीरपणे दूर केले आणि हा शेवटचा अडथळा होता." (हेही वाचा, Sion Bridge in Mumbai to Be Demolished: मुंबई येथील ऐतिहासिक सायन ब्रिज पुनर्बांधनीसाठी पाडला जाणार; वाहतूक मार्गात बदल, घ्या जाणून)
स्थानिक रहिवाशांनी बीएमसीच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला आहे. वांद्रे रेक्लेमेशन एरिया व्हॉलंटियर्स ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा विद्या वैद्य यांनी पालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, प्रत्येकाचे योग्यरित्या पुनर्वसन झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. "शाळा, रुग्णालये आणि चर्चजवळील गर्दीमुळे अनेकदा वाहतूक मंदावली जात असे" त्या म्हणाल्या. मुंबई सिटीझन फोरम या एनजीओच्या रहिवासी आणि विश्वस्त लिलियन पेस यांनी म्हटले की, हा परिसर बऱ्याचदा गजबजलेला असतो, विशेषत: पीक अवर्स आणि वीकेंडमध्ये जेव्हा शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या चित्रपट कलाकारांना पाहण्यासाठी गर्दी जमते.