Shravana Putrada Ekadashi 2024 Date: हिंदू धर्मात एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2024) व्रत केल्याने संतती प्राप्ती होते तसेच देवतांचे आशीर्वाद मिळतात. पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. यंदा श्रावण एकादशीच्या व्रताच्या तिथीबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. काहींच्या मते श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत 15 ऑगस्टला असेल तर काहींच्या मते पुत्रदा एकादशी 16 ऑगस्टला साजरी होईल. पुत्रदा एकादशीची नेमकी तिथी कोणती आणि पूजा कशी केली जाऊ शकते हे जाणून घेऊयात.
पुत्रदा एकादशी कधी आहे?
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10.26 वाजता सुरू होत आहे. ही तारीख 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:39 वाजता संपत आहे. त्यामुळे 16 ऑगस्ट, शुक्रवारी श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. (हेही वाचा -पुत्रप्राप्ती साठी केल्या जाणाऱ्या पुत्रदा एकादशीचे महत्व काय? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि व्रत कथा)
पुत्रदा एकादशी पूजाविधी -
श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5.51 ते 8.05 या वेळेत सोडले जाऊ शकते. पुत्रदा एकादशीची पूजा करण्यासाठी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ असते. या दिवशी भक्त भगवान विष्णूचे ध्यान करतात. यानंतर पूजा केली जाते. पूजेसाठी पाटावर पिवळे कापड पसरवले जाते. यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती स्थापित केल्या जातात.
पूजेसमोर तुपाचा दिवा लावला जातो. पंजिरी, पंचामृत, पिवळी फुले, आंब्याची पाने, अक्षता, पंचमेवा, उदबत्ती, फळे, पिवळे कपडे, मिठाई इत्यादी वस्तू परमेश्वराला अर्पण केल्या जातात. तसेच पूजा मंत्रांचा जप केला जातो आणि आरती गायली जाते. शेवटी भोग अर्पण करून पूजा पूर्ण केली जाते आणि सर्वांना प्रसाद वाटप केला जातो.