पंचांगानुसार 19 डिसेंबर 2020 हा एक अतिशय शुभ दिवस आहे. या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची पंचमी आहे. ही पंचमी विवाह पंचमी (Vivah Panchami 2020) म्हणूनही ओळखली जाते. पौराणिक कथांच्या आधारे असे मानले जाते की भगवान श्री राम (Lord Rama) आणि माता सीतेचे (Sita) लग्न याच पंचमीच्या तिथीला झाले होते. ही तिथी श्री राम विवाहोत्सव म्हणून साजरी केली जाते. यंदा 19 डिसेंबर रोजी ही तिथी साजरी होईल. ज्या मुलींच्या लग्नात समस्या उद्भवत असतात त्यांना या दिवशी उपवास करावा असा सल्ला देण्यात येतो. या दिवशी काही ठिकाणी रामाच्या लग्नाची वरात काढण्याचीही प्रथा आहे.
मुहूर्त-
यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी प्रारंभ, शुक्रवार, 18 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी होत आहे. पंचमी तिथी दुसर्या दिवशी 19 डिसेंबर रोजी रविवारी दुपारी 2 वाजून 14 मिनिट पर्यंत असेल. अशा परिस्थितीत 19 डिसेंबर रोजी विवाह पंचमी किंवा राम विवाह सोहळा साजरा केला जाईल.
पंचांगानुसार मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या पंचमीला शुभ योग तयार होत आहे. या दिवशी चंद्र मकर राशीतून कुंभेत प्रवेश करेल. यावेळी घनिष्ठा नक्षत्र असेल. या दिवशी, वर्धमान नावाचा शुभ योग तयार होत आहे.
कथा –
मिथिलाच्या राजा जनकने आपली मुलगी सीतेचे स्वयंवर आयोजित केले होते. या स्वयंवरात भगवान रामने आपला भाऊ लक्ष्मण याच्यासह भाग घेतला आणि भगवान शिव यांचा धनुष्य मोडून सीतेला वरमाला घातली. जेव्हा ही आनंदाची बातमी अयोध्येत पोहोचली, तेव्हा राजा दशरथ वरात घेऊन जनकपूरला पोहोचला. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमीला भगवान श्री राम आणि आई सीतेचे लग्न लागले. (हेही वाचा: शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा, नोकरीत मिळेल बढती आणि पैशाची कमतरता भासणार नाही)
या दिवशी बालकाण्डमध्ये भगवान राम आणि सीता यांच्या विवाहाचा पाठ करणे शुभ मानले आहे. सोबतच कौटुंबिक सुखासाठी संपूर्ण रामचरित-मानसचे पाठ करावे असेही सांगितले आहे.
दरम्यान, भारतीय संस्कृतीमध्ये राम-सीता हे एक आदर्श जोडपे मानले जाते. ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामांनी सदैव मर्यादेचे पालन करून पुरुषोत्तमचे स्थान प्राप्त केले, त्याचप्रमाणे माता सीतेने संपूर्ण जगासमोर पतिव्रता स्त्री असल्याचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले. विवाह पंचमीच्या दिवशी जनकपूर, अयोध्यासह देशातील अनेक ठिकाणी रामविवाह साजरा केला जातो.