Tulsi Vivah 2019 Shubh Muhurat: कार्तिकी द्वादशी दिवशी तुळशी- शाळीग्रामच्या विवाहाचे सनई चौघडे वाजतील 'या' मुहूर्तावर
तुलसी (Photo credits: Wikimedia commons)

Tulsi Vivah 2019 Shubh Muhurat: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वर्षी तुळशी विवाह (Tulsi Vivah 2019) लावला जातो. यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. या सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकल्या जातात. तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची पूजा केली जाते.

आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ झाला आहे. परंतु, असे असले तरी तुळशी विवाह हा ठरावीक मुहूर्तावर लावला जातो. तुम्हालाही तुमच्या अंगणातील तुळशीचा विवाह लावायचा असेल, तर खाली दिलेला शुभ मुहूर्त नक्की जाणून घ्या. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी विवाह करताना ‘या’ गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ)

तुळस ही सर्व हिंदूसाठी पवित्र आहे. तुळशीच्या दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभतं. मृत्यू झाल्यानंतर अंगावर तुळशीपत्र असेल, तर व्यक्ती वैकुंठास जातो, असंही म्हटलं जातं. संत एकनाथांनी तुळशीचे खालील शब्दांत सांगितले आहे.

हेही वाचा - Tulsi Vivah 2019: यंदा तुळशी विवाह 'कधी' आहे आणि 'का' साजरा करतात? जाणून घ्या काय आहे यामागची अख्यायिका

"तुळसीचे पान. एक त्रैलोक्य समान |

उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |

नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे

न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी

योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"

तुळशी विवाह शुभ मुहूर्त (Tulsi Vivah Muhurt 2019)

द्वादशी तिथी आरंभ: 8 नोव्हेंबर 2019 दुपारी 12:24 वाजल्यापासून

द्वादशी तिथी समाप्ती: 9 नोव्हेंबर 2019 दुपारी 02:39 वाजेपर्यंत

तुलशी विवाह करण्याचे अनेक काल सांगितले आहेत. मात्र, बहुधा तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी केला जातो. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसीविवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान केले जातात. त्यानंतर स्वत: जेवण करण्‍याची पद्धत आहे.