Tulsi Vivah 2019: यंदा तुळशी विवाह 'कधी' आहे आणि 'का' साजरा करतात? जाणून घ्या काय आहे यामागची अख्यायिका
Tulsi Vivaha (Photo Credit - Wikimedia Commons)

Tulsi Vivah 2019: हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला (Tulsi Vivah) सुरुवात होते. यंदा 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार असून 12 नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. तुळशीचे लग्न लहानांपासून मोठ्यापर्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुळशीचा विवाह पार पडल्यानंतर हिंदू धर्मात लग्नासाठी तारखा काढण्याची पद्धत आहे. तुळशीचे लग्न हा अनेक कुटुंबामध्ये धुमधडाक्यात साजरा करण्याचाच कार्यक्रम आहे. काही कुटुंबात अगदी खऱ्याखुऱ्या पद्धतीप्रमाणे तुळशी विवाह पार पाडला जातो. तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, तुळशी विवाह का केला जातो? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा खास लेख तुमच्यासाठी.

हेही वाचा - Rabi-ul-Awwal 2019: ‘रबी उल अव्वल’च्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कधी आहे ‘ईद-ए-मिलाद’

तुळशी विवाहावेळी तुळशीचे लग्न भगवान विष्णुसोबत लावले जाते. या दिवशी तुळशीला साडी नेसवली जाते. तसेच तुळशीभोवती ऊस,  झेंडूची फुले,  आवळा, चिंच आदींची मांडणी केली जाते. तसेच तुळशी रुंदावणासमोर आकर्षक रांगोळीही काढली जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. असं म्हटलं जातं की, तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. अर्थात याला अद्याप तरी वैज्ञानिक आधार प्राप्त झाला नाही.

तुळशीचे लग्न लावण्यामागची अख्यायिका –

पौराणिक आख्यायिकेनुसार, जालंधर हा तुळशीचा पती होता. तो अत्यंत अत्याचारी होता. विष्णू देवाने तुळशीला, 'तू माझ्या सेवेत असेपर्यंत तुझ्या पतीला युद्धात कोणीच मारू शकत नाही,' असं वरदान दिले होते. त्यामुळे जेव्हा जालंधर युद्धात जायचा तेव्हा तुळस विष्णूंच्या सेवेत असायची परिणामी जालंधर विजयी ठरायचा. मात्र, असेच चालू राहिल्यास भविष्यात जालंधर संपूर्ण विश्वावर राज्य करेल आणि साऱ्या संसारात त्याच्या अत्याचाराचा हाहाकार पसरेल, अशी भीती महादेव शंकरानी बोलून दाखवली.

हेही वाचा - दिवाळीच्या प्रदूषणामुळे कोरडी झाली त्वचा? नो टेन्शन, 'या' सोप्या उपायांनी पुन्हा प्राप्त करा नितळ आणि मुलायम चेहरा

त्यानंतर जालंधराला संपवण्यासाठी महादेवांनी विष्णूला जालंधराचे रूप घेऊन तुळशी समोर जाण्यास सांगितले. यामुळे तुळस विष्णूजींची पूजा करत नसल्याची वेळ साधत जालंधरावर हल्ला करण्यात आला. तुळशीच्या समोर जालंधराचे मुंडके आणि धड वेगवेगळ्या स्थितीत पडलेले रूप पाहून तिला जबर धक्का बसला. विष्णू देवांनी माझ्या भावनांचा अनादर केल्याच्या रागाने तिने त्यांना रागाच्या भरातच दगड बनण्याचा शाप दिला.

विष्णूला दगडाच्या स्वरूपात पाहून साऱ्या सृष्टीने तुळशीकडे शाप मागे घेण्याची मागणी केली. तुळशीनेही हा शाप मागे घेत जालंधरासोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस तुळशी शिवाय प्रसादाचा स्वीकार न करण्याचा निर्णय विष्णू देवांनी जाहीर केला. म्हणून देव उठनीनंतर कार्तिक महिन्यात शाळीग्राम रूपातील विष्णू सोबत तुळशीचा विवाह केला जातो. तुळशीचा आणि शाळीग्राम दगडाचा विवाह केल्याने कन्यादान केल्यासारखे पूर्ण मिळते, अशी समजूत आहे. त्यामुळे दांपत्यांच्या जीवनातील सुख, शांती समाधान वाढत राहावे याकरिताही तुळशीचे लग्न लावले जाते. बऱ्याचदा दिवाळीसाठी आणलेले फटाके तुळशी विवाहासाठी ठेवली जातात. अनेक ठिकाणी मंगलअष्टकांच्या सुरात तुळशी विवाह पार पाडण्याचीही प्रथा आहे.