Tulsi Vivah Shubh Muhurt 2018 : दिवाळीनंतर काही दिवसांत तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू असते. कार्तिकी एकादशी नंतर म्हणजेच द्वादशीच्या मुहूर्तावर दिवशी तुळशीचा विवाह (Tulsi Vivah) संपन्न होतो. तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील सुरूवात होते. दरम्यान चार महिन्यांच्या काळात देव निद्रा स्थितीत असतात. ते पुन्हा जागे होतात त्यास देवउठनी एकादशी असे म्हणतात. देवउठनी एकदशी पार पडल्यानंतरच सार्या शुभ मुहूर्तांना सुरूवात होते असे म्हटले जाते. यंदा तुळशी विवाह सोहळा मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 या दिवशी आहे.
तुळशी विवाह कसा करतात ?
तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजत जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलाचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. याकरिता तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृंगारांनी सजवल जात. Tulsi Vivah 2018 : तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?
तुळशी विवाह (TulsiVivahMuhurt) शुभ मुहूर्त
द्वादशी तिथी आरंभ: 19 नोव्हेंबर 2018 दुपारी 2:29 वाजल्यापासून
द्वादशी तिथी समाप्त: 20 नोव्हेंबर 2018 संध्याकाळी 5.10 मिनिटांपर्यंत
तुळशी विवाहाचं महत्त्व काय ?
तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. द्वादशीपासून पुढील पाच दिवस हा सोहळा केला जातो. घरामध्ये किमान तुळशीच रोप असण आवश्यक आहे. तुळस वातावरणातील अशुद्ध घटक दुर ठेवण्यास मदत करते, ताजा प्राणवायूचा पुरवठा करते. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होते.
कसे कराल तुळशीचं लग्न
तुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे 3 वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला नववधूप्रमाणे नटवले जाते. त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते.